माविमची नव-संजीवनी

0
422

संजीवनी जाधव

वर्षानुवर्ष समाजाच्या दृष्ट दाशात पिचलेल्या समाज घटकांना महिला विकास आर्थिक महामंडळ अर्थात माविम काय करू शकते ? याचे उदाहरण म्हणजे संजीवनी जाधव होय. स्वावलंबन, आत्मनिर्भरतेबरोबर सामाजिक नेतृत्व आणि उद्यमशीलता बिजे रोवण्याचे काम संजीवनी करत आहे. तिचा हा प्रवास म्हणजे प्रकाशाकडे   जाणारा बनला आहे. जो आज सर्वांना आदर्श आणि प्रेरणादायी ठरत आहे.

शतकानूशतके अस्पृश्य म्हणून हीन वागणूक, अन्याय, अत्याचार सहन करणाऱ्या समाजातील संजीवनीच्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन नवी पहाट उगवली आणि तिचे नाव म्हणजेच ‘विश्वासार्हता’ अशी तिची ओळख जगासमोर आली. यात ‘माविम’चा सिंहाचा वाटा आहे, हे ती अभिमानाने सांगते.

४५-वर्षीय संजीवनी जाधवचा जन्म पालघर जिल्ह्यातील गोरहे या खेडेगावात आणि हिंदू मल्हार-कोळी या आदिवासी जमातीत झाला. घरची परिस्थिति अत्यंत बिकट, हलाखीची. पण तिच्या स्वप्नांना उंच आकाशात उभारी घेण्याचे बळ दिले ते ‘महिला आर्थिक विकास महामंडळ’ म्हणजेच माविमने.

आज संजीवनीच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि याचे कारणही तसेच आहे. सक्षम, स्वयंपूर्ण आणि स्वयंशिस्त या त्रिसूत्राचा अंमल करत तिने स्व-कर्तुत्व आणि स्व-कष्टाने हे यश मिळवले.  आपल्या यशाचा तिला अहंकार नाही तर स्वाभिमान आहे. एका निवांत क्षणी मागे वळून पाहतांना इथपर्यंतच्या प्रवासातील काटे, दुःख ती उघडपणे व्यक्त करत नसली तरी याच आठवणी तिला तिच्याप्रमाणे दुःख, यातना सोसणाऱ्या अन्य भगिनींना मदतीचा हात देऊन पुढे नेण्यास प्रोत्साहन देते.

अनेक वर्षे दुर्लक्षित आणि उपेक्षित असलेल्या आदिवासी समुदायाशी जोडलेल्या ओझाचा भार तिच्या मनावर होता. मल्हार कोळी समाजाने अस्पृश्यतेच्या कठोर वास्तवाचा अनुभव घेतला आहे. अशा समाजात टिकून राहण्यासाठी संघर्ष केला होता. अनेकदा त्यांच्या क्षमतेकडे समाजाने दुर्लक्ष केले होते, त्यात त्यांच्या पारंपारिक रूढी-परंपरा आणि मुख्य प्रवाहात असलेला समाज यांच्यातील दरीमुळे त्यांच्या व्यवसायात आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेत अनेक अडथळे निर्माण झाले आहेत.

राजकारणासारख्या पुरुष प्रधान आणि काहीशा पेच डावपेचच्या भूमिकेत संजीवनीने स्वत:ला कल्पले नसतानाही , संजीवनीने ते आव्हान लीलया पेलले आणि समाजाला स्वतःची ओळख करून दिली. तिच्या या खडतर प्रवासावर नजर टाकताना, संजीवनीने त्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. तिने सांगितले की ” जेव्हा ती ग्रामपंचायतीच्या बैठकांमध्ये फक्त मूक निरीक्षक बनून होती, इतरांच्या मोठ्या आवाजाने तिचा आवाज दबला जात असे.

अशा वेळी माविमने दिलेल्या १० दिवसीय निवासी प्रशिक्षणा मुळे तिच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. त्याचा तिला खूप फायदा झाला.  यामुळे ती बचत गट सदस्य म्हणून सामील झाली.” खरोखरच हा तिच्या आयुष्यातील एक ‘टर्निंग-पॉईंट’ ठरला, ज्याने तिला आत्मविश्वास, नेतृत्व आणि मानसिक आत्मबल दिले, तिच्या आवाजाला ताकद दिली. जणू या प्रशिक्षणाने तिच्या आत्मविश्वासात नव-संजीवनी फुंकली. तीला आपले विचार ठामपणे मांडण्यास आणि तिच्या समाजाच्या समस्या सोडवण्यास प्रोत्साहित केले.

माविमच्या प्रशिक्षणाने जसा संजीवनीच्या विचारात, आचारात सकारात्मक बदल झाला तो तिने आपल्या समाजबांधवांमध्ये परावर्तित करण्यास सुरुवात केली. संजीवनीच्या समुदायाला सरकारी योजनांमध्ये सहभागी होण्यास वाव मिळत नव्हता. दुर्गम  भौगोलिक भूभाग, समाजातील निरक्षरता यासारख्या बाबींमुळे सरकारी योजना, कार्यक्रमांची माहितीच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती. पण संजीवनी आणि तिच्या बचत गटाच्या सदस्यांना माविमकडून सरकारी कार्यक्रमांबद्दल माहिती मिळाल्यानंतर, गोष्टी अधिक स्पष्ट आणि सुलभ होत गेल्या. आता, तिच्या समाजातील प्रत्येकजण स्वत:च्या उन्नतीसाठी सरकारी योजनांचा लाभ घेऊ लागला आहे.

संजीवनी म्हणाली, “माविमच्या प्रशिक्षणामुळे मी आता स्थानिक निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकते. आमच्या हक्कांसाठी लढू शकते आणि आमच्या नेत्यांकडून जे काम अपेक्षित आहे, त्यासाठी आग्रही राहू शकते. आता मला उपेक्षित समजासाठी शासनाने लागू केलेल्या आरोग्यसेवा, शिक्षण, अन्न-सुरक्षा याबाबतच्या अनेक योजनांची माहिती मिळू शकते आणि त्यांचा लाभ गरजूंना मिळवून देता येऊ शकते. माविमने आम्हाला एक गट म्हणून अधिक सक्षम बनविण्यातही सामूहिक शिक्षणाचे महत्व पटवून दिले आणि योजनांची माहिती सामायिक करण्याचे महत्व समजावून सांगितले.”

अगदी निधी मिळवण्यासाठीची धडपड, शिक्षणाच्या कमी संधी आणि संसाधने मिळविण्यातील आव्हाने यामुळे संजीवनीची व्यावसायिक स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. पण माविमच्या सहकार्याने तिला कर्ज उपलब्ध झाले आणि ते तिने स्वतःच्या व्यवसायासाठी म्हणजेच किराणा आणि भाजीपाला खरेदीसाठी वापरले. यामुळे तिला तिची पहिली मोठी ऑर्डर पूर्ण करता आली आणि गावातील पंचायत सदस्यांसाठी दुपारचे जेवणही उपलब्ध झाले. हा एक महत्त्वाचा टप्पा तिने पार केला होता, जो तिच्या पहिल्या-वाहिल्या स्व-कमाईचे द्योतक ठरले, तिच्या या विजयात माविमचा मोठा वाटा होता.

“आर्थिक स्वातंत्र्य मिळल्यापासून मला माझ्या समाजात आणि आजूबाजूच्या गावांमध्ये आदराचे स्थान मिळू लागले. यामुळे माझ्या आत्मविश्वास  द्विगुणीत झाला आणि आता माझा सामुदायिक प्रकल्पांमधील सक्रिय सहभाग वाढू लागला, नेतृत्व करण्याची संधी मिळू लागली आणि महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येऊ लागले,” असे सांगताना संजीवनीचा उर भरून आला.

“माविमचा भक्कम पाठींबा आणि मार्गदर्शन यामुळे मला महत्वाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली. सध्या, मी टेलरिंग व्यवसाय करते, ज्यामुळे केवळ माझ्यासाठीच नाही तर आमच्या समाजातील अनेक महिलांनाही स्थिर उत्पन्न मिळत आहे. आम्ही शिलाई कामाचे चाळीस आदिवासी महिलांना प्रशिक्षण दिले आहे जेणेकरून त्या शालेय गणवेश आणि दप्तर यांसारखे कपडे शिऊन घरासाठी आपला हातभार लावू शकतील. कुशल टेलरच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रशिक्षण सत्रांनी आम्हाला केवळ सर्वोत्तम कौशल्येच शिकवली नाहीत तर आमच्या आत्मविश्वासाचा आलेखही उंचावला,” असे सांगताना तिची कृतज्ञता प्रत्येक शब्दातून व्यक्त होत होती.

माविमने केलेल्या उद्योजकीय मार्गदर्शनाने संजीवनीच्या जीवनात खोलवर सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. व्यवसायातील तिच्या सहभागाचा सकारात्मक परिणाम तिच्या कुटुंबावरच झाला नाही; तिच्या व्यावसायिक आणि सामाजिक परस्पर संवादाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करून गेला, तिच्या सशक्तीकरणाचा तो एक मैलाचा दगड बनला आहे.

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात महिलांकडून मार्गदर्शन घेणारा पुरुष कमीच, मात्र माविमने तिच्यासाठी अशा दुर्मिळ अनुभवाची अनुभूति दिली. “अशी ओळख दिल्याबद्दल आणि सक्रिय पाठिंबा याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते. माविमच  माझ्यासाठी मार्गदर्शकच आहे,” अशा भावना तिने व्यक्त केल्या.

नवीन कौशल्ये आणि ज्ञानाने, संजीवनीने तिच्या समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. विविध कार्यक्रमांना तिला पाहुणे म्हणून आमंत्रित केले गेले आणि सल्ला, मार्गदर्शनाची तिच्याकडून अपेक्षा निर्माण झाली आहे .  ‘विश्वासार्हते’चे दुसरे नाव संजीवनी बनले आहे.

आता, संजीवनी तिच्या कुटुंबातील पुढच्या पिढीला माविमच्या माध्यमातून प्रगतीची दिशा दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. तिने तिच्या बचत गटामधील तीन महिलांना ग्रामपंचायतीत सहभागी होण्यासाठी सक्षम केले आहे, जेणेकरून तिच्या सशक्तीकरणाचा वारसा इतरांना प्रेरणादायी आणि उत्साह देत राहील.

संजीवनी पुढे म्हणाली की, ती आता अधिक स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहे. तिला घराबाहेर पाडण्यासाठी कुणाच्या परवानगीची आवश्यकता भासत नाही. “मी घरातील आर्थिक बाजू, कुटुंब आणि एकुनच सगळे निर्णय स्वतः घेते. मी माझ्या आजूबाजूला पाहते तेव्हा मला असे आढळले की इतर कुटुंबात बारावीपर्यंत शिक्षण झाले की मुला-मुलींची लग्ने लावून दिली जातात. मुले खाजगी नोकरीत सामील होतात किंवा मजूर म्हणून कंत्राटदारांच्या हाताखाली काम करतात,” ती म्हणाली. संजीवनीला तिच्या मुलींच्या कामगिरीचा अभिमान वाटतो. दोघीही खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहेत, तर तिचा मुलगा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करत आहे, जे केवळ तिच्या महिला बचत गटाच्या ३ लाख रुपये कर्जामुळे शक्य झाले आहे. संजीवनीने त्यांच्या शिक्षणाला आणि स्वातंत्र्याला प्राधान्यक्रम दिला आणि  लग्नाचा विचार करण्यापूर्वी त्यांना आत्मविश्वासपूर्ण आणि स्वावलंबी महिला बनवण्याची इच्छा व्यक्त केली. संजीवनीची २३ वर्षीय धाकटी मुलगी, शिवानी ही सध्या एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत आहे. तिने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “पुढील शैक्षणिक उपक्रमांसाठी महत्त्वाकांक्षा बाळगून आहे. माझ्या मैत्रिणी आर्थिक पाठबळासाठी त्यांच्या पतींवर अवलंबून असतात, तर आम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहोत. आम्ही लहानपणापासून आमच्या आईला आत्मविश्वासाने स्वत:ला व्यक्त होताना आणि महत्त्वाच्या बाबींवर तिची मते मांडताना पाहिले आहे. ज्यामुळे आम्हा तीनही भावंडांमध्ये आत्मविश्वास रूजला. आम्ही आमचे शिक्षण केवळ माविमने उपलब्ध करून दिलेल्या कर्जामुळे पूर्ण करू शकलो.”

 

Share this content: