कोणत्याही पारंपारिक शिक्षणाचा गंध नसताना

भिवंडीतील खांडपे गावाच्या रहिवासी ताराबाई चोरघे यांनी दैनंदिन व्यवहार ज्ञानाच्या आधारे मिळवलेले व्यवहार कौशल्य शिक्षितांना अचंबित करते. औपचारिक शिक्षण नसतानाही, ताराबाई सहजतेने लाखो रुपये मोजतात. त्यांच्यातील हा कौशल्य विकास त्यांच्या कुटुंबातील सकारात्मक बदलांबरोबर इतरांना प्रेरणादायी आहे.

रमेश चोरघे यांच्याशी लग्नानंतर सात मुलांचा जन्म झाल्यावर ताराबाईंना मोठा प्रश्न पडला. तिच्या वाढत्या कुटुंबाला कसे सांभाळायचे? कोणतेही शिक्षण किंवा नोकरी कौशल्य नसल्यामुळे तिच्याकडे मर्यादित पर्याय होते. अंगणात उगवलेल्या महुआच्या फुलांपासून दारू बनवून विकण्याचा निर्णय तिला निवडावा लागला. सरकारी परवान्याशिवाय दारू बनवणे आणि विकणे हे बेकायदेशीर असले तरी,

कुटुंबांच्या प्राथमिक गरजा भागवण्याकरिता याशिवाय दुसरा कोणताच पर्याय ताराबाईंना दिसत नव्हता म्हणून त्यांनी तो सुरू केला. जसजशी मुले मोठी होत गेली तसतसे ताराबाईंना जबाबदारीचे ओझे जड होत होते. आर्थिक परिस्थितीमुळे मुलांना शिक्षण देणे कठीण वाटत होते. तरीही ताराबाईंनी आशा सोडली नाही. मोठ्या जिद्दीने तिने मुलांच्या शिक्षणाची स्वप्ने सत्यात उतरवण्याची शपथ घेतली.यासाठी ताराबाईंना महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविमची मोलाची साथ मिळाली.

कुटुंबाला उज्ज्वल भवितव्य देण्याच्या निर्धाराने उत्पन्नाचे नवे स्रोत शोधताना ती माविमकडे वळली. कुटुंबावरील अतुलनीय प्रेम दृढ करण्याबरोबर उज्वल भविष्याकरिता ताराबाईंनी माविम द्वारे २ लाख रुपयांचे बँकेचे कर्ज घेतले. त्याआधारे मिरची पिकवण्यावर लक्ष केंद्रित करून भाजीपाला लागवडीचा यशस्वी व्यवसाय सुरू केला.

हा भाजीपाला लागवड यशस्वी होऊन हातात पैसे उरु लागल्याने ताराबाईंनी दारू बनवण्याचा उद्योग बंद केला. आई-मुलाने मिळून ठिबक सिंचन प्रणाली वापरून अधिक उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केले. नाशिकच्या एका व्यापाऱ्यामार्फत त्यांना मिरचीची निर्यात करता आली. यातून त्यांना अधिकचा फायदा होवू लागला. याबाबत बोलताना ताराबाईंचा पदवीधर मुलगा भावेश म्हणाला “ माविमने आम्हाला कर्ज दिले तेव्हाच आम्ही आमचा व्यवसाय सुरू करू शकलो, नफा मिळवू शकलो आणि काही पैसे वाचवू शकलो.”

कोविड साथीच्या दरम्यान लावण्यात लॉकडाऊनमुळे भाजीपाला लागवडीवर विपरीत परिणाम झाला होता तर दुसरीकडे शहरातील नागरिकांना अन्नाचा तुटवडा भासत होता हे ओळखून ताराबाईंनी माविमची मदत घेत आपल्या भाजीपाल्याची वाहतूक करण्यासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या. मुलगा भावेशने जवळपासच्या गावांतील ३० हून अधिक महिलांकडून भाजीपाला, कडधान्य गोळा करून त्यांची वर्गवारी लावत योग्य त्या क्रेटमध्ये पॅक करून मुंबई, कल्याण आणि आसपासच्या परिसरातील विविध गृहनिर्माण संस्थांमध्ये वितरित केले. या उपक्रमाने ग्राहकांना ताजे शेतमाल उपलब्ध करून दिला आणि या महिला शेतकऱ्यांना आव्हानात्मक काळात उत्पन्नाचा नवा स्रोत मिळवून दिला.

याबाबत बोलताना भावेश म्हणाला “माविमने केवळ मालाच्या वाहतुकीसाठी परवानगी घेतली नाही तर आम्हाला एक वाहन देखील दिले. माविमच्या कर्मचाऱ्यांनी व्यवसायिक अडथळे संपविण्यासह विक्रीला चालना देण्यासाठी वैयक्तिकरित्या हस्तक्षेप केला.” दरम्यान ताराबाईंकडून मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याचे कोविडमुळे निधन झाल्याने व्यापाऱ्याकडील येणे थांबले. व्यापाऱ्याच्या पत्नीकडून ३ लाख रुपये थकीत होते तरीही ताराबाईंनी हार न मानता आपला व्यवसाय सुरूच ठेवला. मात्र व्यवसायात काहीसा बदल करणे आवश्यक वाटल्याने ताराबाई आणि मुलगा भावेश यांना दूध व्यवसायाकडे वळणे महत्त्वाचे वाटू लागले.

दुग्ध व्यवसाय सुरू केल्याने त्यांच्या कमाईत मोठी भर पडेल. या आशेने २०२१ मध्ये, तिने आणखी २ लाख रुपयांचे बँकेचे कर्ज काढले, जे पुन्हा माविमद्वारे सुलभ झाले. त्या पैशातून त्यांनी शेड बांधून सहा म्हशी विकत घेतल्या. ताराबाईंची वाटचाल केवळ उत्पन्न मिळवण्यापुरती नव्हती. तर मुलांना उद्यमशील बनवण्यासाठीची होती त्यांच्या भविष्याची समृद्ध स्वप्ने साकारण्याची होती.

“पूर्वी, माझ्या आईने काही पैसे कमावले, ज्यामुळे आम्हाला आमच्या दैनंदिन गरजा भागवण्यास मदत झाली. आज आम्ही विकसित केलेल्या भरीव व्यावसायिक पायाभूत सुविधांमुळे आमच्या कुटुंबाला समाजात आदराचे स्थान आहे. आमच्या व्यवसायाचा विस्तार केवळ माविमच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाला. त्याशिवाय व्यवसाय वाढ अशक्य झाली असती, तोट्याचा सामना करणे कठीण झाले असते. प्रतिकूल काळात, माविम सारखा मार्गदर्शक असणे अत्यंत उपयुक्त आहे,” असे भावेश सांगत होता.

नवनवी संकटे आली तर संकटांतून संधी निर्माण करणाऱ्या, ताराबाईंची यशोगाथा सर्वांना प्रेरणादायी तर आहेच याशिवाय छोट्या छोट्या व्यवसायांमध्ये येऊ पाहणाऱ्यांकरिता आदर्शवत आहे. याबरोबरच आव्हानांवर मात करत ती आपल्या कुटुंबाचा खंबीर आधारस्तंभ म्हणून उभी राहिली आहे. याबाबत बोलताना भावेश म्हणाला, “माझी आई माविम मध्ये सामील झाल्यापासून काही वर्षांत आमचे वार्षिक उत्पन्न ६० हजारांवरून ५ लाख रुपयांवर पोहोचले, जे आमच्यासाठी एक मोठे पाऊल होते. आम्ही दुर्गम भागातून आलो होतो जिथे आमची स्थानिक भाषा खूप वेगळी होती. मुंबई सारख्या मोठ्या शहरात मराठी बोलली जात असल्याने सुरुवातीला मला त्याचा काहीसा त्रास झाला. पण माविमच्या मदतीने मी स्वतःवर विश्वास ठेवू लागलो. तरीही काही लोक माझ्यावर हसत होते कारण मी शेतात काम करणे निवडले आहे. माझ्या शिक्षणासोबत ऑफिस जॉब, माझ्या आईने मला प्रत्येक टप्प्यावर साथ दिली. माविम आमच्या पाठीशी राहिलेलेच हे सारे शक्य झाले.”

ताराबाईंच्या कुटुंबाकडे आता एकूण १७ जनावरे आहेत. हिरवे गवत वाढवण्यासाठी या कुटुंबाने साडेआठ एकर जमीन भाड्याने घेतली आहे, यातून निर्माण होणारा चारा ते या परिसरातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना विकतात.

जी ते इतर गुरेढोरे मालकांना विकतात. याची त्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी मदत होत आहे “माविमच्या स्वयं सह्या गटातील महिलांनी बनवलेली उत्पादने खरोखरच उत्कृष्ट आहेत. त्यांच्या विक्री करून नफा वाढण्याकरिता आम्ही जोरदार मार्केटिंग करतो ज्यामुळे या अल्पभूधारक महिलांना आर्थिक मदत होते असे भावेश सांगत होता.

ताराबाईंचा मोठा मुलगा मुकेश म्हणाला “आम्ही आता आमच्या जुन्या घराची पुनर्बांधणी करणार असून लवकरच तिकडे स्थलांतरित होत आहोत. माझी पत्नी आणि ताराबाईंची मोठी सून नाजुका आता ताराबाईंकडून प्रेरणा घेऊन या कामात सहभागी झाली आहे. तिलाही या कामात सहभाग होताना आनंद होत आहे.” माविमच्या समर्पित पाठिंब्याने ताराबाईंच्या कर्तृत्वाने नवीन उंची गाठली आहे. तिचा दुग्धव्यवसायाचा विस्तार हेच तिचे यश नाही. तर इतरांसाठी प्रेरणा बनले आहे. ताराबाईंचे हे काम महिलांमध्ये उद्योजकता रुजवण्याबरोबर सामाजिक एकोपा वाढवणारेही आहे. याबरोबरच माविमचे महिला सशक्तिकरण दर्शवणारे यशस्वी उदाहरण मानावे लागेल.

Share this content: