शिवसेनेत बंडखोरी का झाली?

0
1028
सुजीत महामुलकर

शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने महाराष्ट्रच नव्हे तर दिल्ली, मग त्यात मोठे राष्ट्रीय राजकीय पक्ष भाजप, काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस हादरून गेले. शिवसेनेला त्याचा मोठा फटका बसलाच, नव्हे तर शिवसेनेचे अस्तित्वच धोक्यात आल्यासारखे वातावरण राज्यात निर्माण झाले आहे. सेनेच्या 55 पैकी जवळपास 40 हून अधिक आमदार आपल्याकडे असल्याचा दावा शिंदे यांनी आज (बुधवारी 22 जून) रोजी केल्याने ‘ठाकरे सेने’चे रूपांतर ‘शिंदे सेने’तच झाल्याची चर्चा माध्यमांमध्ये होत आहे.

शिवसेना: मुंबई विरुद्ध उर्वरित महाराष्ट्र संघर्ष
सेनेचा जन्म मुंबईत झाला. अगदी सुरुवातीपासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतचे बहुतांश सहकारी मुंबईतील असल्याने पक्षाचा चेहरा हा ‘शहरी’ बनला, याला अपवाद ठाण्याचा वाघ आनंद दिघे, यांनी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण वस्ती, आदिवासी पाड्यापर्यंत सेना झपाट्याने पोहोचवली. मात्र तीच उर्वरित-महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात म्हणावी तशी रुजली, ती अनेक वर्षांनंतर. गेल्या जवळपास साडे तीन दशकात म्हणजेच 1985 नंतर सेनेचा विस्तार राज्यभर झाला आणि भाजपसोबत 1995 सत्ता स्थापन झाल्यानंतर सेना झपाट्याने तळागळात पोहोचली.

‘दुनिया गोल है’ असे म्हणतात, तसंच काही सेनेचं झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. म्हणजे काय तर मुंबईतून महाराष्ट्रभर भरारी घेणारी सेना आज पुन्हा मुंबईतच येऊन एकवटली. कसे? आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणाऱ्या आमदारांमध्ये 80-90% आमदार मुंबईतीलच आहेत तर शिंदे यांच्या सोबत असलेल्या आमदारांमध्ये 90% पेक्षा जास्त आमदार हे मुंबईबाहेरील ग्रामीण भागातील आहेत, म्हणजेच अगदी ठाणे, कल्याण, पालघर पासून ते विदर्भ, मराठवाडा, कोकण, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. याचाच अर्थ जे बोलले जाते की, सेनेचा जीव, प्राण हा ‘मुंबई’ आहे ते खरं असल्याची प्रचिती येते. त्यात शिवडी चे आमदार अजय चौधरी यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी झालेली नियुक्ती, यावर शिक्कामोर्तबच करते.

शिवसेनेवर ही वेळ का आली?
उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे शिवसेनेत गेल्या दहा-पंधरा वर्षांत विशेषतः बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यू नंतर मुंबईतील लोकप्रतिनिधींना नेहमीच झुकते माप दिल्याचे दिसून येते. ठाकरे यांच्या आजूबाजूला ही जवळपास असणारी मंडळी ही मुंबई based आणि प्रामुख्याने कोकणपट्ट्यातील असल्याने उर्वरित महाराष्ट्रातील नेत्यांना कधी ठाकरेंच्या जवळ जाता आले नाही किंबहुना जाऊ दिले नाही, अशी कुजबूज पक्षात नेहमीच होत असे. एकनाथ शिंदे यांच्याबाबतही काही प्रमाणात हेच झाले. त्यांच्या कामात, खात्यात वाढता हस्तक्षेप यासारख्या सर्वश्रुत आरोपाव्यतिरिक्त त्यांना प्रादेशिकतेवरूनही ‘साईडलाइन’ केले गेले आणि दुय्यम वागणूक दिली जात होती, अशी पक्षाच्या आतल्या गोटातील माहिती आहे.

जरी त्यांना महत्त्वाचे खाते म्हणजेच नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) दिले गेले ते त्यांची ताकद ओळखून आणि वर-वर दाखवण्यासाठी देऊ केले गेले असेही बोलले जाते. याचे कारण त्यांना महत्त्वाचे खाते दिले नसते तर पक्षात त्यांना डावललं जात आहे, असा थेट, उघड संदेश जनतेत गेला असता. महत्वाची खाती आणि जनादेश लाभलेला नेता असूनही त्यांचा पक्षात म्हणावा तसा सन्मान केला जात नव्हता, अशी त्यांच्या निकटवर्तीय यांची भावना आहे. शिंदे यांनी व्यक्त केलेल्या मतांना नेहमीच डावलले जात असे, महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांना विश्वासात न घेणे, त्यांच्या मतांचा आदर न करणे, यातून निर्माण झालेली खदखद आणि अशीच खदखद उर्वरित महाराष्ट्रातील इतर आमदारांमध्येही झाली आणि त्यांच्या भावनांचा झालेला उद्रेक म्हणजेच आजचा ‘बंड‘ हा त्याचा परिपाक.

पुढे काय होणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देऊन शिंदे यांना महा विकास आघाडीचे मुख्यमंत्री करणार? शिंदे भाजपला पाठिंबा देणार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री होणार? भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करून शिंदे स्वतः मुख्यमंत्री होणार? की भाजप, शिंदे यांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करुन नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री आणि

शिंदे यांना उपमुख्यमंत्री करणार?
या प्रश्नांची अचूक उत्तर आजच्या घडीला जगातील कोणताच राजकीय विश्लेषक देऊ शकत नाही, तर केवळ परिस्थितीनुरूप आकलनानुसार अंदाज व्यक्त करू शकतो आणि आजच्या परिस्थितीमध्ये भाजप एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपवून शकते, अशी शक्यता नाकारता येत नाही. असे झाले तर भाजपला अपेक्षित असलेलं सेनेच ‘राजकीय नुकसान’ (politically damage) मोठ्या प्रमाणावर होऊ शकते, त्याच बरोबर जनतेत ‘खलनायक’ म्हणून जाणारी भाजपची प्रतिमा वाचू शकते.

Sujit-Mahamulkar-300x271 शिवसेनेत बंडखोरी का झाली?

(सुजित महामुलकर हे ज्येष्ठ पत्रकार असून टाइम्स ऑफ इंडिया मध्ये त्यांनी अनेक वर्ष सहाय्यक संपादक म्हणून काम पाहिले आहे.)

इसे भी पढ़ें – शिवसेना विधायकों को भरोसा नहीं कि उद्धव ठाकरे के नेतृत्व में वे दोबारा चुनाव जीत सकेंगे

Share this content: