वेन्सी डिमेलो
आजच्या आधुनिक युगातील एका शिक्षण तज्ञाच्या पुस्तकाची आजच्या शैक्षणिक आस्तेची, संवर्धनाची, समग्र अशी सफर आज मी तुम्हाला घडवणार आहे. ह्या पुस्तकाचे लेखक शैक्षणिक मर्म नि मूल्य शोधणारे नि जाणणारे प्राध्यापक डाॅ. पॅट्रिक डिसोजा हे एक ख्रिस्ती धर्मगुरू आहेत. एक उत्तम लेखक, शिक्षकतज्ञ, वक्ता, निरुपणकार, मानवी व्यक्तित्व संवर्धन तज्ञ, चिंतक, भाषाप्रभू समुपदेशक अशा अनेक बिरुदांनी ते वसईच्या पंचक्रोशीत ओळखले जातात.
चला तर आपण ह्या बाजारात नव्याने आलेल्या त्यांच्या ‘TREASURES OF HUMAN PERSONHOOD’ या नव्या पुस्तकातील शैक्षणिक जाणिवांची सफर आपण करुया. अर्थातच मी सफरीतील फक्त प्रेक्षणीय स्थळांची ओळख नि माहिती करून देणार आहे. प्रत्यक्ष प्रेक्षणीय स्थळांचा आस्वाद घेणे हे आपणास प्रत्यक्ष हे पुस्तक वाचूनच मिळवावा लागेल.
हे पुस्तक इंग्रजी भाषेत प्रसिद्ध झालंच आहे. आता ते मराठी भाषेतही “वसा मानवी व्यक्तित्व संवर्धनाचा.” या नावाने पुढील काही महिन्यांत मराठी भाषेत मराठी भाषिकांना उपलब्ध होणार आहे.
“जीवनात जो रडला नाही. परमेश्वर त्याला कळला नाही.” रडणे देखील खळखळून हसण्यासारखे सकारात्मक कसे असते आणि सर्वांगीण, सर्वस्पर्शी मानवी व्यक्तीमत्व घडविण्यास कसे पूरक असते हे लेखकाने स्पष्ट केलेले आहे. रडणे, शोक करणे, विलाप आक्रोश करणे हा मानवी जीवनाचा एक भाग मानवाने नकारात्मक म्हणून मानलेला आणि म्हणून दुर्लक्षिलेला लेखकाने एक मानवी गुण म्हणून संजीवन देऊन जिवंत नि सकारात्मक केला आहे. आणि “मानवाचे हसरे दुःख” असे त्यांनी त्यांचे वर्णन केले आहे. आणि त्यातून सार्वभौम परमेश्वराचे, विधात्याचे, निर्मात्याचे वा सृजनाचे जी उपाधी लावाल ती त्यातून दर्शन घडवले आहे. व्यक्तित्व घडविण्यासाठी ज्ञान विज्ञान जरी पुरक असले तरी तेवढे पुरे नाही. व्यक्तीच्या अंगी असलेल्या विविधांगी सुप्त गुणांना सुखदुःखाना चेतना देणे हे देखील शिक्षणातील परीपूरणतेचे लक्षण आहे. “Not only Information, but formation too” ज्ञान माहिती केवळ तंत्रज्ञानच नाही. तर मानवाची समग्र घडणही तितकीच महत्वाची. म्हणून जन्मदाती आई कदाचित साक्षर नसेल परंतू शहाणी नक्कीच असते. ते तिच्या दररोजच्या खडतर व्यवहारिक जीवन अनुभवातून. हे तिने तिच्या अंगच्या मुलभूत संस्कारातून मिळविलेले असते. “So not only knowledge but wisdom too”
असे अनेक सिद्धांत लेखकाने पुस्तकात मांडले आहेत. ते केवळ लेखकाच्या कल्पकतेतून नव्हे तर वेळोवेळी काॅलेजमधील विद्यार्थ्यांच्या नैपुण्याच्या कार्यशाळा घेऊन त्या संशोधनातून गोळा केलेला हा जीवनरसाचा समग्र मकरंद आहे. जीवनाचे संकलित सार नि फलीत आहे.
अलिकडे आपल्या स्वातंत्र, समता, सत्य, न्याय अशा विचारांचे, विशाल मनाचे, व्यक्तीमत्वाचे जगात सुसंस्कृत असे विद्यार्थी घडवण्याच्या जागतिक समतेच्या स्पर्धेत आपला देशातील काही ठराविक लोक मात्र छद्मी विज्ञान आणि शिक्षणाचे संकोचित धर्मांध पौराणिकीकरण, भगवीकरण करण्याच्या ह्या जीवघेण्या फंदातील स्पर्धेत अडकलेले दिसत आहेत. आणि दुर्दैवाने राज्यकर्त्यांचा आणि सत्ताधारींचा ह्याला आशीर्वाद आहे. अशा मागास शैक्षणिक विचारांच्या संकोचित मानसिकतेला लेखकाने ह्या पुस्तकात विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनातून एक चांगलीच चपराक लगावलेली दिसते आहे. यात डुलक्या नि डुबक्या घेणाऱ्या समाजाला खडखडून जाग आणली आहे. त्यातून बाहेर आणण्याचा प्रयत्नही केला आहे.
डाॅक्टर राॅबर्ट रस्क हे ग्लॅक्सो येथील विद्यापीठातले प्राध्यापक व एक शिक्षण तज्ञ आहेत. त्यांनी ‘थोर शिक्षक व त्यांची तत्वज्ञाने’ हा ग्रंथ लिहिला आहे. तो मी अभ्यासला आहे. त्या ग्रंथात तत्वज्ञानी प्लेटोपासून आरंभ करून पाश्चात्य अकरा प्रकांड पंडित शिक्षणतज्ञांचा त्याने समावेश केला आहे. त्यात जेज्वीट संघाचे संस्थापक संत इग्नेशियस लोयोला हा एक आहे. ‘मूलगामी आणि जीवनाचा सर्वस्पर्शी, समग्र, सर्वांगीण, आध्यात्मिक नि ऐहिक विचार करणारा, शिक्षणाद्वारे मानवी व्यवहारांना नवी दिशा दाखविणारा प्रवर्तक’ असे इग्नेशीयसविषयी त्याने लिहिले आहे. असेच शिक्षणाचे मूलगामी विचार करणारे द्रष्टेपण लेखकाने ह्या पुस्तकात जपलेले दिसत आहे.
शिक्षणाचा इतिहास मानवजातीच्या अगदी सुरुवातीपासून सुरू होतो. मनुष्याने या ग्रहावर पाय ठेवला त्या दिवसापासून मानवी शिक्षणाची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर पिढ्यांपिढ्या, विविध ऐतिहासिक कालखंडात असंख्य प्रवृत्ती, बदल आणि नवकल्पनांचा साक्षीदार बनून ती चालू राहिली. तीच्या सध्याच्या अभिव्यक्तीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच शिक्षणाची संकल्पना आणि त्याची उद्दीष्टे युगानुयुगे विकसित होत असताना परिवर्तनाच्या जोरदार प्रक्रियेतून गेली आहेत.
लेखक अनेक शिक्षणतज्ञांचे संदर्भ आपल्या पुस्तकात देतात. त्यापैकी लेस्टर स्मिथ (१९५७)( Lester Smith) यांनी शिक्षण या संकल्पनेच्या या समजुतीचे तपशीलवार वर्णन लेखकाने उद्धृत केले आहे. ते म्हणतात की… “शिक्षण ही संज्ञा सहजपणे परिभाषित करण्यायोग्य नाही. आणि जर एखाद्या व्याख्येचा प्रयत्न केला गेला तर ती व्याख्या कायम स्वरुपी राहणार नाही. कारण शिक्षणाची प्रक्रिया सतत बदलत असते. त्यात सातत्य असते. गतीशिलता असते. आणि काळ आणि परिस्थितीच्या मागणीशी स्वत:ला जुळवून घेत असते.
शिक्षण हे स्वत:ला विशिष्ट व्याख्येला आधार देत नाही. अडकवून घेत नाही. उधारीही ठेवत नाही. परंतु त्यामुळे आपल्याकडे आलेल्या विविध व्याख्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याची तशी गरजही नाही; आपण त्यांच्याकडून बरेच काही शिकू शकतो, अगदी अधिकृत, निःसंदिग्ध असे उत्तर …
शिक्षण म्हणजे काय? या प्रश्नाला; आणि त्यातील विविध व्याख्या हे देखील सूचित करतात की, शिक्षणाचा विचार करताना आपण हे विसरता कामा नये की, त्यात सजीवांची वाढती गुणवत्ता आहे. त्यात अंतिमतः कायमस्वरूपी गुणदोष असले, तरी शिक्षण हे सतत बदलत असते, नव्या मागण्या आणि नव्या परिस्थितीशी स्वत:ला जुळवून घेत असते. (पृ. ७)
पुस्तकाचे लेखक फादर डॉ पॅट्रिक डिसोजा यांच्या मते विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेल्या ज्ञानाच्या विशिष्ट शाखेतील ज्ञान आणि कौशल्य प्रदान करण्याबरोबरच मानवी व्यक्तित्वाची समग्रता आणि त्याच्या पैलूंमध्ये वाढ करणे हे शिक्षणाचे ध्येय असले पाहिजे. जेव्हा शिक्षणाच्या भूमिकेच्या ह्या पैलूकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्याचा कल केवळ शैक्षणिक ज्ञान व कर्तृत्वावर असतो, तेव्हा शैक्षणिक प्रणाली अविभाज्य मानवी विकास घडवून आणण्यात अपयशी ठरते. अंतिम निकालात उच्च श्रेणी मिळविण्यासाठी जीव घेणी स्पर्धा सुरू राहते. ज्यामुळे नैराश्य उदासीनता आणि अथांग अशा सरोवराऐवजी शेवाळ प्रणित त्याची डबकी बनली जातात. आणि त्या नैराश्यातून जीवन नकोसे वाटू लागते. माझी ह्या जीवनात इतिकर्तव्यता काय? आणि अशाने विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढते. ह्यांची सुदैवाने विद्यार्थ्यांच्या मानवी व्यक्तित्वाच्या वाढीच्या महत्वाची. पालक, शिक्षक शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षणसंस्थांच्या व्यवस्थापनाला जाणीव झाली आहे. हे स्तुत्यच आहे.
विद्यार्थ्यांच्या मानवी व्यक्तित्त्वाची वाढ हे शिक्षणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून लेखकाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मानवी व्यक्तित्त्वात वाढ करण्यासाठी पूरक शैक्षणिक कार्यक्रमाचा आराखडा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मानवी व्यक्तित्वाच्या वाढीसाठी तो आयोजित करण्याची संपूर्ण प्रक्रिया या पुस्तकात स्पष्टपणे वर्णन केली आहे.
पूरक शैक्षणिक कार्यक्रम (SEP- SUPPLEMENTRY EDUCATIONAL PROGRAMME) विकसित करण्याच्या उद्देशाने पेशाने अध्यापक क्षेत्रात असलेल्या ह्या सृजन, अभ्यासू, व्यासंगी लेखकांने संशोधन सुरू केले. यौवनातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मानवी व्यक्तित्वात वाढ करण्यासाठी कार्यक्रम, कार्यशाळा शिबीरे आयोजित करताना प्राप्त झालेल्या अंतर्दृष्टी आणि विविधांगी संसाधन व्यक्ती आणि सहभागींच्या अभिप्रायामुळे लेखकाला त्यात सतत मूल्यांकन आणि आवश्यक बदल करण्यास मदत झाली आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मानवी व्यक्तित्त्वात वाढ करणारा पूरक शैक्षणिक कार्यक्रम विकसित करण्याची ही गरज निर्माण होण्यामागचे एक मुख्य कारण म्हणजे त्याबाबत लेखक म्हणतात….
“महाविद्यालयीन अभ्यासक्रमात प्रामुख्याने विविध शाखांमध्ये विशिष्ट ज्ञानक्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाते. अभ्यासाच्या प्रचलित शैक्षणिक ज्ञान प्रणालीमुळे विध्यार्थी त्यांच्या स्वत: च्या निवडलेल्या ज्ञानाच्या क्षेत्रात तज्ञ बनू शकतात, परंतु ते त्यांच्या प्रशिक्षणाच्या कक्षेच्या बाहेरच्या वस्तुस्थितीला व समस्यांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या अंगभूत कौशल्याने धैर्य, हिंमत, साहस, विरता सामाजिक, आध्यात्मिक, राजनीती आदि मूल्ये गुणांनी सुसज्ज बनू शकत नाहीत. म्हणून आपल्या देशातील बुद्धिजीवी व्यक्तींनी, सुज्ञ तज्ञांनी, द्रष्ट्यांनी आणि शिक्षणतज्ज्ञांनी, देशभरातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंनी आणि विविध महाविद्यालयांमधील प्राचार्यांनी आणि शिक्षकांनी अशा पूरक शैक्षणिक कार्यक्रमाचे स्वागत करणे अत्यावश्यक आहे.
असा कार्यक्रम विद्यार्थ्यांना त्यांचे मानवी अस्तित्व विकसित करण्यास प्रोत्साहित करेल. आणि मदत करेल. ज्यामुळे ते बाह्य जगाचा आणि त्यांच्या अंतर्मनाचा सामना करण्यास सक्षम होतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात ज्या समस्यांना सामोरे जावे लागेल त्या बौद्धिक, भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक, शारीरिक, वैज्ञानिक, कलात्मक, नैतिक, आध्यात्मिक, धार्मिक किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या असू शकतात. आणि विध्यार्थी ह्या समस्या समजून घेण्यास, प्रतिबिंबित करण्यास, त्यांचे गंभीरपणे मूल्यांकन करण्यास आणि त्यांना प्रभावीपणे सामोरे जाण्यास सक्षम असणे आवश्यक आहे” असे लेखक या ग्रंथात आवर्जून आवाहन करतात.
हा पूरक संशोधन शैक्षणिक कार्यक्रम शिक्षकांसाठी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मानवी व्यक्तित्व विकसित करण्याच्या उदात्त कार्यात सहभागी असलेल्या सर्वांसाठी उपयुक्त ठरेल. पूरक शैक्षणिक कार्यक्रमाच्या विविध सत्रांमध्ये सहभागींच्या मनात लक्षणीय विकास घडवून आणता यावा म्हणून लेखकाने संसाधन व्यक्तींना ह्या विविध सत्रांचा पद्धतशीरपणे वापर करण्यास मदत करण्यासाठी या पुस्तकात असंख्य मौल्यवान सूचना केल्या आहेत.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मानवी व्यक्तित्वाच्या वाढीसाठी, या पुस्तकात समाविष्ट केलेल्या सत्रांव्यतिरिक्त इतर सत्रे कार्यक्रमात समाविष्ट करता येतील आणि विविध क्षेत्रातील तज्ञांना ही सत्रे तयार करण्याची आणि आयोजित करण्याची विनंती केली जाऊ शकते. ती मोकळीक त्यांना असू शकते.अशी सुचनाही लेखक विनम्रपणे करतात.
लेखक म्हणतात… “त्यांना पीएच.डी.च्या प्रबंधाच्या स्वरूपात एखादे पुस्तक प्रकाशित करायचे नव्हते, तर शिक्षक, विद्यार्थी आणि मानवी व्यक्तित्वाच्या संवर्धनात रस असलेल्या सर्वांसाठी ते एक प्रकारचे माहिती पुस्तक (manual) बनवायचे होते. जेणेकरून ते सहभागींच्या हितासाठी त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमध्ये पूरक शैक्षणिक कार्यक्रमाचे विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी वापरू शकतील”.
स्वत:चे मानवीय नि निसर्ग प्रेमी मानवेतर व्यक्तित्व वाढविण्यासाठीही या पुस्तकाचा उपयोग करता येईल. सहभागींच्या गटासाठी पुरवणी शैक्षणिक कार्यक्रमातील प्रत्येक उपक्रम आयोजित करण्याची पद्धत आणि जर एखाद्याला ते स्वत:साठी वैयक्तिक स्वरूपात जरी वापरायचे असेल तर ते आयोजित करण्याची पद्धत देखील लेखकाने यात तपशीलवार स्पष्ट केली आहे. पुस्तकाचा हा हेतू लक्षात घेऊन लेखकाने मूळ पीएच.डी.च्या प्रबंधातील काही क्लिष्ट भाग वगळले आहेत. आणि प्रक्रिया अधिक स्पष्ट करण्यासाठी काही भागांची त्यात भर घातली आहे. पुस्तक वाचनीय व्यावहारिक नि सुबोध करण्याचा त्यांचा कल प्रयत्न दिसतो आणि वगळलेल्या विभागांमध्ये संबंधित साहित्याचे पुनरावलोकन, संप्रेषणाच्या परिप्रेक्ष्यात संशोधन, संशोधन पद्धती, डेटा संकलन, डेटा विश्लेषण, अशी प्राथमिक स्वरूपाची माहिती. सांख्यिकीय विश्लेषण, संशोधन साधनाच्या प्रमाणीकरणासाठीच्या तज्ञांची यादी, सारणी, आकडे, आलेख आणि इतर काही साहित्य जे ह्या पुस्तकाचा उद्देश साध्य करण्यास योग्य नव्हते ते त्यांनी वगळले आहेत. त्यामुळे हा ग्रंथ सलग असा वाचनीय होतो. सुबोध होतो.
ह्या पुस्तकाच्या निमित्ताने लेखकाने ज्या गोष्टी मोठ्या कौशल्याने जोडल्या आहेत, त्यात मानवी व्यक्तित्व भागफल Human Personhood Quotient (HPQ) या संकल्पनेचे वर्णन करणारा लेखकाचा एक विभाग आहे. बुद्ध्यांक (IQ), भावनिक बुद्ध्यांक (EQ) सामाजिक बुद्ध्यांक (SI), आध्यात्मिक बुद्ध्यांक (SQ) आणि प्रतिकुलता बुद्ध्यांक (AQ)) या संकल्पनाबरोबरच लेखकाने एखाद्या व्यक्तीच्या मानवी व्यक्तीत्ववाढीची पातळी शोधण्यासाठी मानवी व्यक्तीत्व भागफल (HPQ) प्रस्तावित केला आहे. आणि त्याचे मोजमाप करण्यासाठी एक मापणीची पद्धत (Scale) देखील सादर केली आहे.
पुस्तकाचे महत्त्व:
हे पुस्तक पुढील बाबींवर महत्त्वपूर्ण प्रकाश टाकणारे नि प्रेरणा देणारे ठरेल असे एक वाचक मुक्त अभ्यासाचा नि मुक्त विद्यापीठाचा एक चाहता म्हणून मला वाटते.
१) वाचकांना त्यांचे मानवी व्यक्तित्व वाढविण्यासाठी प्रेरणा देणे.
२) वाचकांना आरोग्याविषयी जागरूक राहण्याची प्रेरणा देणे
३) वाचकांना त्यांच्या विचारसरणीत विवेकनिष्ठ आणि टीकात्मक चिकित्सक बनण्याची प्रेरणा देणे.
४) वाचकांना इतरांच्या विचारांबद्दल आणि समजुतींबद्दल सहिष्णू होण्याची प्रेरणा देणे
५) वाचनसंस्कृती विकसित करण्यासाठी वाचकांना प्रेरणा देणे.
६) मानसिक बळ वाढविण्यासाठी वाचकांना प्रेरणा देणे.
७) भावनिक बुद्धिमत्ता वृद्धिंगत करण्यासाठी वाचकांना प्रेरणा देणे.
८) वाचकांना चारित्र्य घडण नि निर्माण करण्यासाठी आध्यात्मिक आणि नैतिक परिपूर्णतेसाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देणे.
९) वाचकांना स्वत:च्या स्वधर्माची आणि इतर धर्मांची समज वाढवण्यासाठी प्रेरणा देणे
१०) इतर धर्मांबद्दल मनापासून आदर निर्माण करण्यासाठी आणि धार्मिक सलोखा निर्माण करण्यासाठी वाचकांना प्रेरणा देणे
११) वाचकांना आत्मसाक्षात्कारासाठी झटण्याची प्रेरणा देणे.
१२) वाचकांना सर्जनशील होण्यासाठी प्रेरणा देणे. केवळ भावोत्कट न होता वास्तवाचे भान असणे.
१३) सामाजिक भान नि बांधिलकी विकसित करण्यासाठी वाचकांना प्रेरणा देणे. विचारात वास्तव पकडून ते कृतीत बदलणे.
१४) समाजात जबाबदारी स्वीकारण्यासाठी वाचकांना प्रेरणा देणे.
१५) समाजाची काळजी घेण्यासाठी आणि समाजसेवेत सहभागी होण्यासाठी वाचकांना प्रेरणा देणे.
१६) बंधुभाव, सामाजिक सलोखा, मानवता आणि संस्कृती विकसित करण्यासाठी वाचकांना प्रेरणा देणे.
१७) हे पुस्तक भविष्यातील अभ्यासकांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मानवी व्यक्तित्व संवर्धन या क्षेत्रात पुढील संशोधन करण्यासाठी प्रेरित करेल…
१८) ज्यासाठी लेखकाने पुस्तकाच्या शेवटी समारोपात काही विषय सुचवले आहेत.
ज्यातून शेवटी, वाचकांना त्यांच्या मानवी व्यक्तीत्ववाढीची पातळी शोधण्यासाठी चाचणी घेण्याची प्रेरणा मिळेल. जसे लेखकाने आधी नमूद केले आहे की, पुस्तकाच्या शेवटी ते मानवी व्यक्तित्व भागफल (HUMAN PERSONHOOD QUOTIENT(HPQ) ला एखाद्या व्यक्तीच्या मानवी व्यक्तिमत्व वाढीच्या पातळीचा अंदाज लावण्यासाठी प्रस्तावित केले आहे. आणि त्याचे मोजमाप करण्यासाठी एक मानवी व्यक्तित्व भागफल (HPQ) मापणीची पद्धत (Scale) विकसित केली आहे.
१९) जरी पूरक शैक्षणिक कार्यक्रम प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मानवी व्यक्तित्वाला चालना देण्यासाठी तयार करण्यात आला आहे, तरी लेखक म्हणतात…
त्यांना असे वाटते की त्यामुळे जीवनाच्या सर्व स्तरातील लोकांसह आणि सर्व वयोगटातील आणि प्रत्येक समुदायाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाला मदत होईल. कारण मानवी व्यक्तित्व वाढविणे ही केवळ एक गरजच नाही तर प्रत्येक व्यक्तीचे ध्येय असले पाहिजे. पूरक शैक्षणिक कार्यक्रमाचे विविध कार्यक्रम अशा प्रकारे तयार केले गेले आहेत की ते विविध गटांशी संबंधित लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बदल आणि नाविन्यपूर्णतेसाठी भरपूर वाव प्रदान करतात.
व्यक्ती किंवा गटातील सदस्य संपूर्ण कार्यक्रम घेऊ शकतात किंवा एका वेळी कार्यक्रमाचा कोणताही भाग निवडू शकतात. आणि त्याचा वापर करू शकतात किंवा त्यांच्या परिस्थितीनुसार त्यात बदल करू शकतात आणि वैयक्तिकरित्या किंवा गटाचे सदस्य म्हणून त्यांचे मानवी व्यक्तित्व वाढवू शकतात. दुस-या शब्दांत सांगायचे तर, पूरक शैक्षणिक कार्यक्रम केवळ शालेय नि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्याच नव्हे तर सर्व सामान्य लोकांच्या मानवी व्यक्तित्वाच्या घडणीसाठी वाढीसाठी देखील आहे.
अंतिमता समग्र शिक्षणासाठीची, व्यक्ती आणि विश्व घडविण्यासाठी शिक्षणातील मर्म शोधून जी मुल्याधिष्टित मूल्ये जशी की श्रम प्रतिष्ठा, राष्ट्रभक्ती, स्त्रीपुरूष समानता, सर्वधर्मसहिष्णुता, राष्ट्रीय वैश्विक एकात्मता, निसर्ग संवर्धन, वैज्ञानिक दृष्टिकोन, संवेदनशीलता, सौजन्यशिलता, वक्तशीरपणा आणि निटनिटकेपणा अशी मूल्ये जागतिक शैक्षणिक तज्ञांनी उद्याच्या जगाच्या उद्धारासाठी उद्धृत केली आहेत. त्याला पुरक असेच हे पुस्तक झाले आहे. ते लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. उद्याचे विश्व हे आजच्या शाळा काॅलेजातूनच घडणार आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांवर एक व्यक्ती म्हणून आणि विश्वाचा भावी जबाबदार नागरिक म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर समग्र संस्कार आवर्जून होणे आवश्यक आहे असे सांगणाऱ्या ह्या ग्रंथाचे आपण स्वागत करुया. आणि शिक्षणातील एक अनुभवी प्रकांडपंडीत तज्ञ फादर पॅट्रिक ह्यांच्या प्रचंड शैक्षणिक कार्याचे, कष्ट, मेहनतीचे अभिनंदन नि कौतुक करून त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देऊया.
(हे पुस्तक लेखकाच्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध ई-बुक आणि ऑडिओ बुक या रुपात FREE downloading साठी उपलब्ध आहे. लेखकाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर हे पुस्तक आपल्याला डाऊनलोड करता येईल. वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायला सुद्धा आपल्याला काही मोबदला द्यावा लागणार नाही. लेखकाने हे त्यांचे पुस्तक त्यांच्या वेबसाईटवर मोफत डाऊनलोडिंगसाठी उपलब्ध केलेले आहे. की जेणेकरून तळागाळातील व ग्रामीण भागातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना नि व्यक्तींना ह्या पुस्तकाचा अधिकाधिक लाभ नि फायदा व्हावा. अशी लेखकाची तीव्र इच्छा आहे.)
आपल्यापैकी कुणाला जर या पुस्तकाची छापील प्रत हवी असेल तर आपण फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा यांच्या व्हाट्सअप नंबर 7030447934 वर त्यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा
या पुस्तकाचे प्रकाशक
डॉक्टर विशाखादत्त पाटील, क्लॅरिकसिस पब्लिकेशन, अंधेरी पश्चिम 400058
फोन नंबर 9820356506 यांच्याशी संपर्क साधू शकता.
लेखकाची वेबसाईट:
https://worldofemotions.in
संपर्कासाठी:
लेखक फादर डाॅ. पॅट्रिक डिसोजा. 7030447934
Share this content: