दादी जानकी – दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती

0
853

मुंगी उडाली आकाशी तिने गिळीले सूर्यासी. संत ज्ञानोबांच्या भगिनी मुक्ताई यांच्या बद्दल हे उद्गार काढले जातात. आमच्या “दादी जानकी “यादेखील अशाच एक मुक्ताई. खऱ्या अर्थाने नभाला गवसणी घालणारी, नव्हे नव्हे, तर याच नभांगणाच्या पार वास करणाऱ्या पार ब्रह्म, विश्ववंदनीय, ज्ञान सूर्याला आपलेसे करणारी, आणि विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते ते हे की संपूर्ण चराचराला, अखिल मानव जातीला प्रभू प्रेमाच्या सूत्रात बद्ध करणारी एक आगळी वेगळी माय. तेव्हा त्याकाळी १९३७ च्या वेळी केवळ बीज होतं. आज त्याचा वटवृक्ष झालाय. काय केलं या मायने? दुःखितांचे अश्रू पुसले. त्यांना आपलेसे केले .जीवन कसं जगावं त्याबरोबर ते सफल कसं करावं (भौतिक अर्थाने नाही) त्यात अलौकिकता कशी आणावी, केवळ याच भारत भूमध्ये नाही तर विदेशातही या मायने आपली आईची माया अर्थात प्रेम पसरवलं. जापनीज, अमेरिकन, जर्मन ,ऑस्ट्रेलियन, श्रीलंकन कोणीही असो, प्रत्येकालाच ती मनापासून आवडली. तिचं बोलणं म्हणजे प्रत्येकाचे जगणं झालं. अशी आर्तता असायची तिच्या शब्दांत. तितकंच माधुर्य, जिव्हाळा, सप्तरंगी इंद्रधनुषी पण सुद्धा झळकायचं तिच्या वैखरीतून .खऱ्या अर्थाने सरस्वतीच जणू तिच्या जिभेवर वास करायची.

नावाप्रमाणेच सत्यता व समर्पणता यांचा उत्कृष्ट मिलाफ म्हणजे दादीजी. परमात्मा शिव हेच सत्य व त्यात समर्पणाची वृत्ती म्हणजेच दादी जानकी. असावं तर अगदी असं. सत्यम शिवम सुंदरम् असलेल्या, संपूर्ण ब्रह्मांडाला ज्याने निर्मिले त्या जगदीश्वराला, ज्याची लीला अपरंपार आहे त्या लीलाधराच्या गुणांविषयी व कर्तव्या विषयी त्याच्याच मुलांना जागृत करणे हे महानतम कार्य. “आत्मा परमात्मा अलग रहे बहुकाल “अर्थात आपणा सर्वही जिवात्म्यांपासून तो परमपिता परमात्मा खूप काळ दूर राहिला. आणि गीतेच्या वचनाप्रमाणे “यदा यदा ही धर्मस्य “तोच एकमेव त्याच्याबद्दल बोलले जाते त्वमेव माता श्च् पिता त्वमेव असा तो करावनहार प्रभू सृष्टीवर अवतरीत होतो त्याच्याच मुलांच्या कल्याणार्थ, आणि नेमके हेच शाश्वत व चिरंतन असे सत्य दादीने सर्वांना समजावून सांगितले. व अशा दुरावलेल्या माय लेकरांची भेट घडवली. विषय विकारांच्या अर्थात काम क्रोध लोभ मोह आणि अहंकार यांच्या विषवल्लीतून सोडवून अमर संजीवनी देणाऱ्या अमृता घनाशी सर्वांनी एकरूप व्हावं, हाच एक दादीचा निश्चय. आणि म्हणतातच ना निश्चय बुद्धी विजयंन्ति।

वात्सल्य, ममता, दिव्यता, संतुष्टता, अंतर्मुखता, धिरोदात्त पणा या सर्वही दैवी गुणांनी संपन्न असा हा सर्व गुणसंपन्न आत्मा. काही व्यक्ती स्वयंप्रिय असतात तर काही लोकप्रिय व काहीच प्रभुप्रिय. पण तीनही बाबतीत प्रिय असणाऱ्या आमच्या दादीजी हे या पुरुषोत्तम संगम युगातील एक नवलच. परमेश्वराच्या हृदय सिंहासनावर आरुढ झालेलं आगळं वेगळं प्रभुप्रिय फुल.
या मायचा जन्म १९१६ ला हैद्राबाद सिंध प्रांतात झाला. लहानपणापासूनच ईश्वराबद्दल अत्यंत प्रीती .तदनुसारच दादीचं प्रत्येक वर्तन घडत असे. एका जुन्या हिंदी गाण्यात म्हटले आहे-
दुनिया में ऐसा कहां सबका नसीब है।
कोई कोई अपने पिया के करीब है।

खरोखरीच दादी बाबतीत ही विधाने लागू पडतात .ती जमात खरोखरच भाग्यवंतांची जे प्रभूच्या अगदी समीप असतात. वयाच्या २१ व्या वर्षी या मायने स्वतःला प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात समर्पित केले कारण हे केवळ एक ईश्वरी कार्य नव्हते तर एक रुद्र ज्ञान यज्ञ होता. यात स्वतःला संपूर्णतः (मन बुद्धी संस्कार) स्वाहा करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्या कोवळ्या नवथर वयात या माय मध्ये निर्माण व्हावी याचे कारण म्हणजे-
जनसेवेचे बांधून कंकण त्रिभुवन सारे घेई जिंकून
अर्पून अपुले दृढ सिंहासन नित भजतो मानवतेला तोची आवडे देवाला।

तत्कालीन समाज व्यवस्था अशी होती की स्त्रीला पायाखालची दासी समजले जायचे .स्त्रीला असं स्वतःचं वेगळं अस्तित्व नव्हतंच मुळी.देशही पारतंत्र्यात अडकलेला व स्त्री ही संपूर्ण परतंत्र अवस्थेत. लहानपणी पिता, तरुणपणी पती ,वार्धक्यात पुत्राच्या तालावर नाचणारी ती स्त्री होती .केवळ भोगदासी म्हणूनच तिच्याकडे बघितले जायचे .एक शोभेची, करमणूक करणारी बाहुलीच बनली होती ती त्यावेळी. मानवी मनांमध्ये देखील संस्कृतीच्या ऐवजी विकृतीच जास्त जन्म घेऊ लागली होती .अनेक विध अत्याचार जुलुम यांनी त्यावेळी चा समाज भरडून निघत होता. नैतिक अवमूल्यन होऊ लागले होते .समाज अधिकाधिक अध्ःपतित होत चालला होता .अगदी अशाच वेळी त्या बाबुलनाथाचे (अर्थात बाभळासारख्या काटेरी बनू लागलेल्या मन बुद्धीचे सुंदर सुवासिक फुलात रूपांतर करण्यासाठी) करुणाकाराचे तारण हाराचे ,निराकार शिव परमात्म्याचे विश्वकल्याणासाठी सृष्टीवर अवतरण झाले. स्वयं भगवान आपले आकाश सिंहासन सोडून आपल्या लाडक्या लेकरांसाठी पृथ्वीवर येता झाला. आकाश धरित्रीचे महामिलन, तो प्रसंग काय वर्णावा! जीवा शिवाची भेट जो घेईल त्यालाच त्यातला अमृतानुभव मिळेल. असो दादी जानकी याच अमृतानुभवात न्हाऊन निघाली. पाना था सो पा लिया कुछ भी रहा न बाकी. हे ओठातून न येईल तरच नवल! आणि सुरू झाले मग विश्व कल्याणाचे अथांग ईश्वरीय कार्य.
हा राजस्व अश्वमेध यज्ञ आपल्या विजयाचा डंका वाजवत देश विदेशात पोहोचू लागला.
दादी द्वारा झालेल्या लोकोत्तर कार्याविषयी-
१९३७- दादी जानकी ईश्वरीय कार्याशी जोडल्या गेल्या.

१९३७ ते १९५१ – ब्रह्माकुमारीच्या आरोग्य केंद्राच्या प्रमुख म्हणून कार्यरत राहिल्या. ते कार्य करीत असताना ठीक ठिकाणी आरोग्य उपक्रम राबवले. शरीराबद्दल सर्वच जण काळजी करतात. बाहेरील शत्रू आक्रमण करू नये म्हणून आपण स्वतःला खूपच जपतो. पण बाह्य शत्रूंपेक्षाही अंतर्गत शत्रू महाभयानक असतात. त्यांच्यापासून सावध कसे राहावे त्यांच्यावर विजय कसा मिळवावा हे दादीने समर्थरित्या सर्वांना पटवून दिले. त्यासाठी प्रदर्शने भरवली. परिसंवाद आयोजित केले. अगदी पथनाट्य देखील आयोजित केली. केवळ जनजागरण व्हावे यासाठी. आपण कोण आहोत व आपलं त्या जगदीश्वराशी काय नातं आहे, त्या नात्याची महानता व महिमा काय आहे हे देखील दादीने सर्वांना समजावून सांगितले. १९७४ ते आज पावतो विश्वविद्यालयाचा विस्तार म्हणजे १४२ देशात ९००० एवढी सेवा केंद्र यात दादीचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. १९८३ मध्ये विश्वविद्यालयाच्या उपमुख्य प्रशासिका म्हणून दादींची नियुक्ती केली गेली. ‘दान’ या प्रकाराबद्दल आपण सर्वजण जाणतो .दानवीर म्हणून कर्णही प्रसिद्ध आहेच. परंतु एका वेगळ्या दानाची योजना दादीद्वारे बनवली गेली. आणि हे दान म्हणजे शांती दान होते . शंभर करोड मिनिटांचे शांतीचे दान द्यावे असा उपक्रम आखला गेला त्याला अनुसरून प्रत्येकानी दिवसभरातील थोडा वेळ स्वतःच्या व विश्वाच्या शांतीसाठी दिला. त्यासाठी ब्रह्माकुमारीजला सात UN Peace Messenger Awards मिळाली. संपूर्ण विश्व ची माझे घर या उक्तीप्रमाणे सर्वांप्रती कल्याणाची भावना, आत्मीयतेची भावना यातून विकासाची जोपासना कशी व्हावी, सर्वांचाही सहयोग कसा प्राप्त करावा, किंवा सहयोगाची वृत्ती कशी वृद्धिंगत होईल यासाठी House Of Lords, London येथेही एक कार्यक्रम आयोजित केला गेला. एक आंतरराष्ट्रीय समन्वय कार्यालय (International Co-ordinating Office) व्हावे अशी दादीची इच्छा होती. त्याच अनुषंगाने जागतिक सहकार्याचे घर (Global Co-operative House) याची निर्मिती लंडनला दादीने केली. दादीच्या ९० व्या वाढदिवसाला रॉबिन गिब्ज याने Mother Of Love हे गीत दादीला समर्पित केले. Courage Of Conscience Award नी केंब्रिज येथे दादीला सन्मानित करण्यात आले.

रियो येथे एक शिखर परिषद आयोजित केली गेली होती. तेथे राजकीय नेत्यांना मार्गदर्शन व्हावे, उत्कृष्ट नेतृत्व कसे असावे यासाठी काही धार्मिक व अध्यात्मिक नेत्यांना आमंत्रित केले गेले. तेथेही दादी जानकी यांनी कुशल संघटन कसे असावे त्या संघटनाला दिशा देणाऱ्या नेतृत्वामध्ये कुठले गुण असावेत, त्या गुणांचा सर्वांना व देशाला कसा फायदा होईल याचे विवेचन दादी मार्फत केले. World Congress Of Faith च्या उपाध्यक्षपदी दादीची नेमणूक केली गेली .ऑक्सफर्ड येथे दादीमार्फत ग्लोबल रिट्रीट सेंटर उघडण्यात आले. मॉस्को रशियामधील MAMA या संस्थेच्या सहकार्याने Second International Congress Of Mother दिल्ली येथील ओम शांती रिट्रीट सेंटर येथे आयोजित केली गेली होती, तेथेही आपले शब्द भांडार दादीने सर्वांसमोर प्रस्तुत केले.

UNICEF ला पन्नास वर्षे पूर्ण झाली हे औचित्य साधून एक सोहळा आयोजित केला गेला होता. त्यालाच अनुसरून मुलींच्या जन्माचं सर्वार्थाने कौतुक व्हावं यासाठी एक बौद्धिक प्रवर्ग बनवला गेला त्यात काही स्त्रियांचा अंतर्भाव होता. मुलीला जन्म देण्यात सर्वांना आनंद वाटावा त्याचं महत्त्व सर्वांना पटावं स्त्रीला देखील स्वतःच्या अस्तित्व विषयी कार्यक्षमते विषयी निपुण ते विषयी जाणीव व्हावी व जवळपास विश्वभरातील सर्वही व्यक्तींमध्ये याबद्दल जागरूकता यावी याबद्दल कळकळीने पुढाकार घेऊन या महान मंगल भावनेचं उदात्तीकरण करण्यात दादी अग्रेसर राहिली. सेंन फ्रान्सिस को (USA) येथील State Of World Forum मध्ये प्रमुख वक्ता म्हणून दादीला बोलावण्यात आले. तेथील श्रोत्रु वर्गालाही दादीने भरपूर केले .पुणे कर्वेनगर येथे सद्गुरू परिवार या संस्थेकडून ‘सद्गुरु भूषण’ पुरस्काराने दादीला तिच्या लोकोत्तर कार्याबद्दल गौरविण्यात आले. जागतिक शांति दिनानिमित्त दादीने ओमान येथेही आपली आध्यात्मिक मते आत्मविश्वासाने लोकांसमोर मांडली.शांतीचे महत्त्व सर्वांना विशद केले .शांतीच आत्म्याचा स्वधर्म आहे. आत्म्यात जे सात गुण असतात, त्यातला शांती हा प्रमुख गुण आहे .शांतीधाम हे सर्व आत्म्यांचे निवासस्थान आहे. जर गळ्यात हार घालायचा असेल तर जरूर शांतीचा हार घाला असे दादीने सांगितले. Peace आणि Silence मधील फरक दादीने सर्वांसमोर मांडला. आंतरराष्ट्रीय महिला परिषद जयपूरला झाली, तेथेही दादीला आमंत्रित केले होते. स्वानुभवाचा साराच खजाना अर्थात अनुभवाची ऑथॉरिटी सर्वांसमोर व्यक्त केली. न्यूयॉर्क असो, जेरुसेलम असो, जिनिव्हा असो, सिंगापूर असो, ओमान असो, कराची असो, जपान असो ,अगदी भारतातील कुठलेही राज्य असो, सर्वत्र दादीने आपल्या अमोघ अमूर्त वाणीने आत्म्यांची मने जिंकली व ईश्वराची खरी ओळखही सर्वांना करून दिली. त्याचमुळे पाहतोय ना १४२ देश व ९००० एवढी सेवा केंद्र व त्यात सहभागी असलेला लाखोवधी ईश्वरीय परिवार. म्हणूनच ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने( Platinum Jubilee) ONE GOD,ONE WORLD, ONE FAMILY हा कार्यक्रम देश विदेशात ब्रह्माकुमारीद्वारा साजरा झाला. खूपच छान वाटते ना. हे सर्वही करून कर्तेपणाचा थोडासा ही यत्कांचितही लवलेश नाही. गीतेच्या १८ व्या अध्यायातील श्लोक- नष्टोमोहा स्मृतीर्लब्धाः।दादीसाठी परफेक्ट लागू पडतो. दादीने हे देखील सांगितले की स्व पुरुषार्थासाठी परमात्म्याने तीन मंत्र दिलेले आहेत-
१) मामेकम् शरणं व्रज।( मला एकट्यालाच शरण ये.)
२) मन्मना भव।(तुझ्या मनात माझी स्मृती ठेव.)
३) नष्टोमोहा स्मृतिर्लब्धा। अर्थात या पतित विनाशी दुनियेचा मोह सोडलास तरच तुला तुझ्या आदि अनादी आत्मिक स्वरूपाची प्राप्ती होईल. दादीने हे देखील सांगितले, परमात्म्याने हे तीन मंत्र जप करण्याकरता दिलेले नसून-( मंत्राचा अर्थ मनाला तारण्याची ज्याच्यात क्षमता आहे असा तो मंत्र) स्वतःच्या जीवनात खरे उतरवायचे आहेत. अर्थात त्याचा गर्भितार्थ जाणून तदनुसार कर्म करायचे आहे.

आमच्या दादीजीना Most Stable Mind In The World हा UNO द्वारे पुरस्कार बहाल करण्यात आला. आपण IAS बद्दल जाणतोच .ही संस्था खऱ्या अर्थाने WAS अर्थात World Administrative Service करीत आहे. ही एक आध्यात्मिक संस्था असून येथे राजयोग अर्थात भगवंता द्वारा शिकवला जाणारा योग, सर्व योगांचा राजा, म्हणजे सर्वश्रेष्ठ योग शिकवला जातो. याबद्दल असे म्हटले जाते-
राजयोग का राज जो जाने राजाई पद पाये।
राजाओं का बन जाये राजा शिव से प्रीत लगाये।
पवित्रता की योग है खान कोटि कोटि इसमें वरदान।
योग को कर्मौ में लाकर के कर्म सुकर्म बनायें,शिव से प्रीत लगायें।

आमची दादी हे प्रत्यक्षात आपल्या गुणांनी, कर्मांनी, बोलांनी, संकल्पांनी प्रत्ययास आणायची.श्वासोश्वास केवळ शिव आणि शिवच. आपलं ज्ञान आपले तपोबल व आपले योगसमर्थ्य असा दुहेरी नव्हे तर त्रिवेणी संगम असलेल्या दादी जानकी यांनी अखिल मानव जातीची निरंतर सेवा केली .त्यांनी उच्चारलेल्या एकेका वाक्यात पडलेल्याला उठवण्याची क्षमता होती. दादी म्हणायची तुमच्याजवळ या तीन गोळ्या सदोदित असू द्या, -Peace, Patience,Love. तुमचं शारीरिक व मानसिक दोन्ही स्वास्थ्य त्यामुळे उत्तम राहतील.२०२० ला आमच्या दादी १०४ वर्षांच्या होत्या. त्याही वयात तरुणाला लाजवेल असा दुर्दम्य आत्मविश्वास दादींकडे होता. सुप्रसिद्ध युवा नेता स्वामी विवेकानंद यांनी देखील म्हटले होते की मी माझ्या आयुष्यात ८० वर्षांचा युवक व १८ वर्षांचा वृद्ध बघितला आहे. तरुणाची व्याख्या अशी केली जाते- जो हा भवसागर सहजगत्या तरुन जातो व इतरजनांनाही तारून नेतो तो खरा तरुण. याचाच अर्थ असा होतो की ज्याच्या जीवनात उत्कटता, तेजस्विता, तपस्विता, तत्परता या गुणचतुष्ट्यांच दर्शन होतं ,तोच खरा तरुण. तसेच जो आशिष्टः म्हणजे आशावादी ,द्रढिष्ट्ः म्हणजे द्रृढाग्रही व बलिष्ठः अर्थात आत्मबलाने संपूर्ण या तिन्ही गुणांनी युक्त अर्थात गुणत्रयी तरुण असतो. अगदी आमच्या दादींसारखा. तात्पर्य असं की कोणी वयाने वृद्ध होत नाही तर त्याने केलेल्या विचारशक्तीने होतो.

जसे एखादी स्त्री तिच्या पातिव्रत्यामुळे वेगळी भासते, वैज्ञानिकाचे विज्ञान पण त्याच्या कलाकृतीतून दिसते तर तदनुसार राजयोगी व्यक्तीचेही वेगळेपण त्याच्या संस्कार परिवर्तनातून दिसून येते असं आमची दादी म्हणायची. दादीमध्ये कर्तव्यनिष्ठा ,दृढनिश्चय, सत्यता, शिस्त बघायला मिळायची. दादी म्हणायची मेरा तो एक बाप दुसरा न कोई।एक बल एक भरोसा। केवळ परमात्मा! दादी सांगायची, आजची रंगीबेरंगी दुनिया काही मान्यतांमध्ये गुरफटून गेली आहे. धर्माच्या नावावर आपापसात भांडतात ,लढतात व मृत्युमुखी देखील पडतात. म्हणताना म्हणायचं हिंदू-मुस्लीम सिख ईसाई हम सारे भाई भाई। तरीही रंगवतात ना एकमेकांच्या रक्तांनी आपले हात. वास्तवात येथे विश्वविद्यालयात येऊन ही गोष्ट समजते की मी कोण? मला माझा स्वतःचा परिचय तर मिळतोच व परमेश्वराचा देखील .जेव्हा भगवंताने सर्वप्रथम ही सृष्टी रचली तेव्हा ती खरोखरीच सुंदर होती. पण आपण मनुष्य आत्म्यांनी विकारांच्या गर्तेत राहून या सुंदर दुनियेला भकास करून टाकलं .आणि वाढली मग अशांती, अराजकता, अस्थिरता. जीवनात स्थिरता आणणारा, शांती, ज्ञान, सुख ,आनंद, प्रेम, पवित्रता, शक्ती, प्रदान करणारा, नराला नारायण व नारीला लक्ष्मी बनवणारा केवळ भगवंत आहे. म्हणूनच दादी म्हणायची, सदैव एका परमपिता परमात्म्याच्या लव मध्ये लवलीन रहा. कारण जैसा चिंतन वैसा जीवन। शिवाचा अर्थच कल्याणकारी. जेव्हा आपण राजयोगाद्वारे शिवाशी प्रीत जोडू तेव्हा आपणही स्वकल्याणाबरोबर विश्वकल्याणाच्या निर्मितीत सहभागी होऊ. या संगम युगात आपण योगबळ जमा करू शकतो व संस्कारांमध्ये दिव्यता आणू शकतो. ज्याप्रमाणे साप आपली जुनी कात टाकून नवी धारण करतो त्याच प्रकारे आत्मा राजयोगाद्वारे आपले जुने आसुरी स्वभाव संस्कार टाकून नूतन दैवी संस्कार धारण करतो. दादी सांगायची- माझे ध्येय एकच होतं मी सर्वांसमोर एक उदाहरण बनावं. कारण मला घडवणारा, या सर्वोच्च अवस्थेपर्यंत आणून पोहोचवणारा स्वयं भगवंत आहे. सदैव निरीक्षण करा आमच्यात सर्व गुण कुठपर्यंत आलेले आहेत, कोणता छोटासा देखील अवगुण तर राहिला नाही ना असे दादी म्हणायची. सच्चे दिल पर हमेशा साहब राजी होता है। इसीलिए हमेशा ‘सच्चा’ बनो.

वर्तमान समयी ८७ वर्षांपासून संपूर्ण विश्वात ईश्वरी सत्यज्ञानाचा प्रकाश पोहोचवण्याचे कार्य प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय करत आहे. स्वयं निराकार परमात्मा पित्याने सर्व आत्म्यांच्या कल्याणासाठी स्थापन केलेले हे एकमेव विश्वविद्यालय आहे. शिव परमात्म्याने ज्ञानाचा कलश माता भगिनींच्या मस्तकावर ठेवला आहे. हे विद्यालय सर्वांसाठी खुले आहे वयाची, जाती-धर्माची, पंथसंप्रदायाची अट नाही. तसेच येथे कुठलेही शुल्क आकारले जात नाही. मूल्यधिष्टित समाज घडवण्यात या विश्वविद्यालयाचा अति मोलाचा वाटा आहे. यात आपणांस नररत्नांची खाणच पहावयास मिळेल. अमूल्य हिऱ्याची खरी किंमत ज्यावेळी श्रेष्ठ जवाहिरी आपणास सांगतो तेव्हाच येते. अशाच प्रकारचा अनुभव आपणास या विश्वविद्यालयात आल्यावर येईल. यात शिकवल्या जाणाऱ्या राजयोगात असे कोणते रसायन आहे की जे सहारा वाळवंटातही नंदनवन निर्माण करू शकते? दादी सांगायची हे जर कळावे अशी इच्छा असेल तर जरूर याचा रसास्वाद घ्या. अमृतपान करा. यात आपणास काय मिळणार नाही? जीवनातील जटिल समस्यांची उकल, मानसिक कौटुंबिक शांती ,समृद्ध समाजाचे रहस्य ,आर्थिक विवांचनेतून मुक्ती, सर्व ही बाबतीत अंतर बाह्य शुद्धी याचे समग्र दर्शन आपणास येथे घडेल कारण हे सर्वोत्तम पावन तीर्थस्थान किंवा चैतन्य शिवालय आहे.

शिवाला मुक्तेश्वर असेही म्हणतात. जो आपणा सर्वांना भवबंधनातून सोडवतो तो मुक्तेश्वर ,जो आपणास मुक्ती जीवन मुक्ती प्रदान करतो तो मुक्तेश्वर, जो आपणास गती सद्गतीचे ज्ञान देतो तो मुक्तेश्वर, जो आपणास सर्वही विकर्मांपासून मुक्त करतो तो मुक्तेश्वर ,जो आपणास या लोकात असूनही वैकुंठ रस चाखवतो तो मुक्तेश्वर ,आणि बरं का याच मुक्तेश्वराला आपलं सर्वस्व अर्थात तन-मन धन समर्पित करणारी व त्याच्या सांगितलेल्या श्रीमताचा मेरुदंड अखिल विश्वभरात घेऊन जाणारी आमची अतिप्रिय अशी ही राजयोगिनी मुक्ताई .या मुक्ताईच्या स्मृतिदिना निमित्त आमचे कोटी कोटी प्रणाम.
नुतन रविंद्र बागुल
(ब्रह्माकुमारी गामदेवी)

Share this content: