शिवसेना: कोण जिंकणार कोण हरणार?

0
710
सुजित महामुलकर

बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व अन्य आमदारांना उद्देशून केलेल्या ‘फेसबुक लाईव्ह’ मनोगतामध्ये अत्यंत भावनिक आवाहन केले. यात त्यांनी पक्षाच्या आमदारांना ग. दि. माडगूळकर यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे घराकडे अपुल्या, तिन्हीसांजा जाहल्या’ अशीच जणू साद घातली. उद्धव ठाकरे यांच्या या 17:47 मिनिटांच्या निवेदनात जिंकूनही हरल्याच्या भावना स्पष्ट दिसत होत्या.

शिवसेना आणि शिवसैनिकांनी आजपर्यंतच्या इतिहासात अनेक बंड झेलले आणि मोठ्या धैर्याने परतऊनही लावले आहेत. ज्या क्षणी एखाद्या नेत्याने बंडाचे हत्यार उगारले त्यानंतर शिवसेनेने आणि सामान्य शिवसैनिकांनी कधी हल्ला तर कधी शिवराळ भाषा वापरून व निषेध करून त्याला प्रत्युत्तर दिले, असा इतिहास आहे.

गेल्या दोन दिवसात असा प्रखर विरोध झाल्याचे ऐकिवात नाही. खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांनाबाबत अपशब्दही वापरला नाही, याउलट स्वतः मुख्यमंत्री पदच काय तर पक्षप्रमुख पदही त्याग करण्याची भाषा केली. अत्यंत सौम्य शब्दात त्यांनी बंडखोर आमदारांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला. त्यात ते किती यशस्वी ठरतात, ते येणारा काळच ठरवेल. एक मात्र नक्की की मातोश्री पासून अन्य बहुतांश आमदार-खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक या बंडाने हादरून गेले, असे म्हणण्यापेक्षा दुःखी झाल्याचे दिसून येते.

सहाजिकच तीन पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये तारेवरची कसरत करत असताना, आपल्याच पक्षातील बंडाने सगळं ‘होत्याचं नव्हतं’ होत असताना बघून मनाला किती यातना झाल्या असतील, याची कल्पना न केलेली बरी.

राजकारणापलीकडचे बंड
हे बंड खरोखरच ऐतिहासिक म्हणून नोंद होईल. इतक्या मोठ्या संख्येने स्वतःच्या पक्षाचे आमदार फोडणे हे एक कारण आहेच. मात्र असे भावनिक बंड यापूर्वी कधी झाले असावे, अशी शक्यता कमीच. बंड करणाऱ्यांनी पक्षनेतृत्वावर थेट टीका केलेली नाही. याउलट बंड पुकारणारे नेतेच म्हणत आहेत की, “गेल्या अडीच वर्षांत सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे-शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.”

जसे उद्धव ठाकरे यांनी पक्ष फुटीपासून वाचण्यासाठी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख पदाच्या त्यागाची भाषा केली तशी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनीही हिंदुत्व, पक्ष व शिवसैनिकांच्या हिताचाच विचार मांडला. दुसरे असे की, शिंदे यांच्या पक्षनिष्ठेनेबाबत त्यांचे राजकीय विरोधकही शंका घेण्याचे धाडस करत नाहीत, असेच आजपर्यंतचे त्यांचे वर्तन दिसून येते. तर मग प्रश्न उपस्थित होतो की, शिंदे यांनी घेतलेली बंडाची टोकाची भूमिका योग्य आहे का? असे असेल तर शिंदे यांना वाढता पाठिंबा देणारे लोकप्रतिनिधी इतके अविचारी आहेत का? शिंदे यांनी यापूर्वी पक्षातील वाढत्या असंतोषाचा पाढा पक्षनेतृत्वापुढे वाचला नसेल का? असेल, तर मग त्यावर कोणताही तोडगा काढण्यात आला नाही किंवा त्याकडे अजाणतेपणे दुर्लक्ष झाले असावे अन्यथा शिंदे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याला गांभीर्याने घेतले नसावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसते.

एकूणच शिवसेनेची ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ अशी अवस्था झाली असून ही कोंडी फुटण्यास एकाची प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार, हे निश्चित. अन्यथा 4 दिवसांपूर्वी 56 वर्षे पूर्ण करणारा आणि ‘साठी’कडे मार्गक्रमण करणारा पक्ष संपणार नाही, पण खिळखिळा झालेला पहाणे, कुठल्याही मराठी माणसाला वेदनादायकच असेल. त्यामुळे कार्यकर्ते-नेते महत्वाचे की पक्ष-प्रतिष्ठा याचा निर्णय राजकारणापलीकडचा विचार करून आणि ‘मी’ पणा बाजूला ठेवून घेण्याची गरज आहे. अन्यथा एक शिवसेना जिंकेल तर दुसरी शिवसेना हरेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

(सुजित महामुलकर हे ज्येष्ठ पत्रकार असून टाइम्स ऑफ इंडिया मध्ये त्यांनी अनेक वर्ष सहाय्यक संपादक म्हणून काम पाहिले आहे.)

(#Sujit Mahamulkar is a senior journalist, he has worked with Times of India, Hindustan Times, Mid Day and Saamna)