महाशिवरात्री महात्म्य

0
2188

।।सत्य गीता ज्ञान सांगण्या शिव अवतरले भुवरी।
अति आनंदे करुया आपण महाशिवरात्री साजरी।।

कालचक्र हे अविरतपणे फिरतच असते आपणाजवळ शिल्लक राहतात त्या केवळ गतकाळातील स्मृती. त्या स्मृतींना उजाळा मिळावा म्हणून देखील सण किंवा उत्सव साजरे केले जातात. सुरुवातीचा थोडा काळ तत्संबंधी सद्भावना, श्रद्धा, स्नेह जिवंत असतात. पण जसजसा काळ सरत जातो तस तसा स्नेह व श्रद्धा यांचा कधीकधी अंत होतो व उरतात त्या केवळ परंपरा.आज काल जे सण व उत्सव साजरे केले जातात ते केवळ एक परंपरा म्हणून साजरे केले जातात असे म्हणणे निश्चितच अतिशयोक्तीचे ठरणार नाही. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. भारतात जितके सण व उत्सव साजरे केले जातात तितके संपूर्ण जगात सुद्धा साजरे होत नसतील. परंतु कुठलाही सण व उत्सव यामागील आध्यात्मिक रहस्य जर का जाणले गेले तर तो उत्सव साजरा करतानाचा आनंद काही औरच असेल नाही. आता लवकरच येऊ घातलेला तुम्हा आम्हा सर्वांच्या आवडीचा ‘शिवअवतरणोत्सव’ अर्थात महाशिवरात्री याबद्दल आज आपण थोडेसे जाणून घेऊया. स्वयंभू अजन्मा निराकार परमपिता परमात्मा शिवाचा ‘अवतरण उत्सव’ हा महाशिवरात्रीच्या रूपाने साजरा केला जातो. आत्म्यांचा जन्म होतो आणि परमात्म्याचे अवतरण. आत्मा आणि परमात्मा यांच्यात हेच मुख्य अंतर आहे. कर्मबंधनामुळे आत्मा मातेच्या गर्भातून जन्म घेतो आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात येतो परंतु परमात्मा पुनर्जन्माच्या चक्रात येत नाही. परमात्मा शिव स्वयंभू आहे त्याचा कोणी पिता नाही. आपण संपूर्ण आयुष्यभर शिवपूजा करीत आलो व्रतवैकल्ये, जागरण करीत आलो तरीही मनुष्यमात्रांचा पाप, ताप संताप का बरे मिटला नाही? शिवरात्रीचे वास्तविक स्वरूप काय आहे? शिवरात्री खऱ्या अर्थाने कशी साजरी केली गेली पाहिजे? शिवाचा रात्रीशी काय संबंध आहे? इतर देवी देवतांच्या मूर्तीवर फुले फळे मिष्ठाने वगैरे वाहतात पण शिवावर मात्रअकवधोतर्‍याची फुले वाहिली जातात. शिवाने असे कुठले कर्तव्य केले त्याची आठवण म्हणून महाशिवरात्री साजरी केली जाते?

माघ महिना हा वर्षाचा अकरावा महिना, माघ महिन्यात कृष्ण पक्षात येणार्‍या त्रयोदशीला महाशिवरात्र साजरी करतात. म्हणजे अमावस्येच्या दोन दिवस आधी येणारी तिथी खर्‍या अर्थाने कलियुग अज्ञान (ईश्वरा विषयीचे अज्ञान) रुपी रात्र आहे, त्यातील कृष्ण पक्षाची चौदावी रात्र, काळीकभिन्न रात्र, महारात्र. त्याच रात्रीस होतो शिव अवतरणोत्सव. जिथे शिवाला शारीरिक रूपच नाही तेव्हा शिवासाठी दिवस व रात्र यात काय फरक? खऱ्या अर्थाने आपण हे देखील जाणतो शिवाला ‘अमरनाथ’ म्हणजेच अमर आत्म्यांचे पिता किंवा ‘मृत्युंजय’ म्हणतात तरीसुद्धा त्यांचा जन्मोत्सव का बरे साजरा करतात? याचे कारण यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत। (अ ४ श्लोक ७) या गीतेतील वचनानुसार जेव्हा ही सृष्टी मनोविकारांच्या वशीभूत होऊन अज्ञानअंधकारात बुडालेली असते आणि लोक पतित तसेच दुःखी होऊन अज्ञान निद्रेत झोपलेले असतात, कामक्रोधादि विकारांनी मानव संपूर्णत: अशांत झालेला असतो, धर्माची ग्लानी झाल्यानेमनुष्य धर्मभ्रष्टकर्मभ्रष्टझालेला असतो. थोडक्यात आत्मा पूर्णतः शक्तीहीन झालेला असतो अगदी अशाच वेळी ज्ञानसूर्य परमात्मा शिव अज्ञानरूपी अंधकाराचा विनाश करण्यासाठी हतौत्साही झालेल्या आत्म्यांना ज्ञानाची नवसंजीवनी देण्यासाठी सृष्टीवर अवतरीत होतात. महाशिवरात्रीचा सण हा केवळ दहा-बारा तासांच्या रात्रीशी संबंधित नसून अज्ञान रात्री शी संबंधित आहे. रात्री लोक विकारांच्या वशीभूत होतात, रात्री सामाजिक नैतिक अपराधही खूप होतात. सर्वत्र तमो गुणांचं वातावरण असतं. आणि नेमक्या याच घडीला परमात्मा शिवाचे, या करुणाकाराचे, जगनियंत्याचे, तारण हाराचे परम धामातून सृष्टीवर अवतरण होते व परमात्मा शिव ज्ञानरूपी अमृतव योगरूपी प्रकाशा द्वारा समग्र मनुष्य मात्राला तमो प्रधानते कडून सतो प्रधान स्वरूपात स्थित करवतात. थोडक्यात आसुरी समाजाचे परिवर्तन करून दैवी समाजाची स्थापना करतात. परमात्म्याचे अवतरण प्रत्येक युगात एकदा किंवा अनेकदा होत नाही तर केवळ कलियुगाच्या अंतिम समयी संगम युगात अर्थात कलियुगाचा अंत व सत्ययुग् आदि त्यांच्या संधी काळात दिव्य अवतरण होते. परमात्मा शिव निराकार ज्योतिर्बिंदू स्वरूप असल्याने त्यांचे दिव्य अवतरण एका वृद्ध मानवी शरीरात १९३६ मध्ये झाले असून त्यांच्या मुखाद्वारे परमात्मा शिव सत्य गीता ज्ञान अर्थात मनुष्यमात्रांना अमर कथा सांगत आहेत. या ज्ञानाची धारणा केल्यानेच मनुष्य पाप,ताप,संताप या सर्वांपासून मुक्त होतो. मनुष्य देवता तुल्य बनतो तसेच भारत भूमी स्वर्ग भूमी बनते म्हणूनच यावर्षी देखील आपण परमपिता शिव परमात्म्याच्या दिव्य अवतरणाची ८७वी शिवजयंती मोठ्या आनंदाने व उत्साहाने विश्वभरात साजरी करणार आहोत.

महाशिवरात्री कशी साजरी करावी? सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तगण व्रत ठेवतात. वास्तविकव्रत ठेवणे हे प्रेमापोटी त्याग करण्याचे प्रतीक आहे. त्यामुळे ‘महाशिवरात्री’ निमित्त आपल्या कमकुवत वृत्तीचा त्याग करून सदैव सर्वांप्रती शुभ व श्रेष्ठ वृत्ती धारण करण्याचे व्रते घ्यावेत्यामुळे कृती देखील आपोआपच शुभ व श्रेष्ठ होईल. कारण कुठलीही चांगली अथवा वाईट गोष्ट ही प्रथम वृत्तित धारण होते व नंतर ती वाणी व कर्मात येते म्हणून श्रेष्ठ वृत्तीचे व्रत धारण करणे हीच खरी ‘महाशिवरात्री’ होय. शिवरात्रीचे पर्व हे शिव परमात्म्यावर बळी चढवण्याचे पर्व समजले जाते. याचेच प्रतीक म्हणून काही ठिकाणी बळी देखील चढवितात. परंतु मन बुद्धी व सर्व संबंधाने शिवावर समर्पित होणे म्हणजे बळी चढणे होय. आपल्यातील सर्वात मोठी कमजोरी म्हणजे देह अभिमानाची. देहभान व देह अभिमान परमात्म्यावर समर्पित करावा. शिवलिंगावर धोतरा वाहतात. ही फुले वाहण्यामागील रहस्य हे आहे की आपल्यातील विषतुल्यविकारांचे दान शिव परमात्म्याला देऊन जीवनात संपूर्ण पवित्रतेचे व्रत धारण करावे. भक्तगण महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करतात. वास्तविक कलियुगी अज्ञान रात्रीत ईश्वरी ज्ञानाद्वारे आत्मिक ज्योती सदैव जागृत ठेवणे अर्थात मन बुद्धीने जागृतावस्था आणणे हेच खरे जागरण आहे. शिवाची जितकी म्हणून नावे आहेत ती सर्व त्याच्या कर्तव्याचा परिचय देतात. उदाहरणार्थ ‘पशुपतिनाथ’ हे नाव घ्या. येथे पशु हा शब्द गाय वा इतर एखाद्या पशुचा वाचक नाही तर ‘आत्मा’ या शब्दाचा वाचक आहे. भारत तसेच परदेशात जे शैव मताचे लोक आहेत त्यांच्या मतानुसार आत्म्याला ‘पशु’ म्हटले गेले आहे.’पशु’ चा अर्थ आहे बांधलेला, आणि प्रत्येक आत्मा माया अर्थात काम क्रोधादि मनोविकार तसेच प्रकृतीच्या बंधनात अडकलेला असतो. म्हणूनच त्याला ‘पशु’ म्हटले जाते. शिव परमात्मा स्वतः बंधनापासून सदैव मुक्त आहे व आत्मरूपी पशूंना मायारूपी पाशापासून मुक्त करणारा आहे म्हणूनच त्याचे पशुपतिनाथ, पापकटेश्वर, मुक्तेश्वर, त्रिभुवनेश्वर इत्यादी नावांनी गायन पूजन केले जाते. आता प्रश्न उद्भवतो की शिवाने आत्मा रुपी पशूंना माया पाशातून कधी मुक्त केले की ज्यामुळे त्याचे नाव पशुपतिनाथ किंवा बाबुलनाथ पडले? त्याने मानव मात्रांची दुःखे कधी हरण केली की त्याला हर व दुःखहर्ता म्हटले गेले? अर्थातच जेव्हा अखिल मानव पतित किंवा पापी झालेले असतील, षङरिपुनी वेढलेले असतील, आणि दुराचाराने भारलेले असतील, असा काळ तर कलियुगाचा अंतिम समयच असतो. म्हणूनच कलियुगाच्या अंतिम समयी परमपिता शिव-परमात्मा जगाचे कल्याण करण्याकरिता या सृष्टीवर अवतरतो.

आपल्या भारतात बारा ज्योतिर्लिंगे प्रसिद्ध असून ती पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि मध्य भागात आढळतात. ती भारतवासीयात भावनात्मक एकात्मता देखील उत्पन्न करतात. भारताबाहेरील देशांमध्ये ही अशाच प्रकारच्या शिवप्रतिमा स्थापित झालेल्या आढळतात. त्या शिवप्रतिमेचे देखील मनोभावे गायन व पूजन केले जाते. जपानमध्ये बौद्ध अनुयायी शिवलिंग् समान प्रतिमा ‘चीन किनसेकी’ समोर ठेवून तिच्यावर मन एकाग्र करतात. इंडोनेशियाच्या जावा व सुमात्रा या दोन्ही ठिकाणी शिवाचे गुणगान होत असताना दिसते. इजराइल देशातही एक शिवलिंग ज्याला ‘बेलफेगो’म्हटलेजाते, शपथ घ्यायचा रिवाज तेथील जनमानसात आहे. चीन देशात शिवलिंगाची उपासना ‘होवेडहिपुह” नावाने चिनी लोक करतात. स्कॉटलंडच्या ग्लास गो शहरात देखील शिवलिंग आहे. इजिप्त मध्ये शिवलिंगाची पूजा आईसीस वओसिरिस नावांनी होते. शिवलिंगाला शिऊन म्हटले जाते. इटली देशातील रूस शहरात शिवलिंगास ‘प्रियपस’ म्हटले जाते.ग्रीस मध्ये शिवलिंगाचे फल्लुस हे नाव आजही प्रचलित आहे, फल्लुस या ग्रीक शब्दाचा अर्थ संस्कृतात ‘फलेश’ अर्थात त्वरित फळ देणारा असा होतो. ऑस्ट्रिया तसेच हंगेरीत ‘तंत्रिस्वक’ नामक शिवलिंगाची उपासना केली जाते. मलेशिया, जर्मनी, स्पेन, सिंगापूर, श्रीलंका, वर्मा, मेक्सिको इत्यादी देशातही शिवलिंगाची उपासना केली जाते. येशू ख्रिस्त, गुरुनानक, पैगंबरयांनीही परमात्म्याला ज्योती स्वरूपच मानले आहे. थोडक्यात शिव परमात्म्याच्या प्रतिमेला विश्वातील सर्व धर्मातील लोक परमेश्वर मानतात. शिव परमात्मा विश्ववंदनीय आहे हे आपणास यावरुनप्रत्ययास येते. थोडक्यात महाशिवरात्री हा सण केवळ भारत वासियांचा नसून सर्व विश्व बांधवांचा आहे.

नुतन रव्रिंद्र बागुल
ब्रह्मकुमारी (गामदेवी)

हे पण वाचा – शिवसेना: कोण जिंकणार कोण हरणार?