स्रिची अंतरदृष्टी बदलणे गरजेचे आहे

0
1132

अंतिम समयी शिव प्रभू अवतरले या अवनीवरी।
ज्ञानामृताचा कलश स्थापिला स्रीच्या मंगल शिरी।
जाग जाग तु नारी आणि घे सतीचे वाण।
शिवशक्ती बनुनी करावे विश्वाचे कल्याण।

जसे फुलांमध्ये गुलाबाला महत्व, शिंपल्यामध्ये मोत्याला महत्त्व , नात्यामध्ये बंधू भावाला महत्त्व, तसेच मानवी जीवनात देखील स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समाजाचे नेत्र व राष्ट्राचे पंख स्त्रीला म्हटले जाते कारण नेत्राद्वारे दिशा गवसते तर पंखांनी उंचच उंच भरारी मारता येते . इष्ट उद्दिष्ट साध्य होते. परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती अर्थात “स्त्री”. वेदांमध्ये स्त्रीला पूज्य व स्तुती योग्य मानले गेले. यक्ष युधिष्ठिराच्या संवादातही जेव्हा यक्ष युधिष्ठिराला विचारतो -भूमी पेक्षा श्रेष्ठ कोण ?तेव्हा त्याचे उत्तरा दाखल युधिष्ठिर म्हणतो माता गुरुतरा भूमे। अर्थात माता भूमी पेक्षाही गौरवास्पद आहे. मनुस्मृति मध्ये २/१४५ देखील सांगितले सहस्त्रांतू पितृन्मात गौरवेणाति। अर्थात मातेचा दर्जा पित्यापेक्षाही हजार पटीने गौरवस्पद आहे. तैत्तिरीय उपनिषदात मातृदेवो भव चा घोष आहे. महात्मा गांधी देखील म्हणायचे जर महिलांनी साथ दिली नसती तर मी भारताला स्वतंत्र करू शकलो नसतो. एवढी जिची महिमा केली जाते त्या स्त्रीच्या वाट्याला आज प्रत्यक्षात काय येते?

अनादि काळापासून स्त्रीला देवीचे स्थान दिले गेले पण काळाच्या ओघात मात्र स्त्री शक्तीचा सन्मान कमी होत गेला. मध्ययुगीन काळानंतर तर स्त्रीला पायाखालची दासी म्हणूनच वागवले गेले. काही अनिष्ट रूढी परंपरांच्या जाळ्यातही तिला अडकवलं गेलं. बालविवाह केशवपन करणे, विधवा पुनर्विवाह बंदी, मुसलमानांमधील पर्दाप्रथा राजपूतांमधील जौहर प्रथा काही ठिकाणी देवदासी म्हणूनही त्यांचे शोषण होत राहायचं खेदाची बाब अशी की आजही काही समाजात या कु प्रथा अजूनही टिकून आहेत शारीरिक दृष्ट्या कमजोर असणारी स्त्री तिच्यावर हात उचलणं म्हणजे काही जणांना त्यात मर्दानगी वाटते. जो स्त्रीवर हात उचलत नाही तो षंढ आहे, स्त्रीचा गुलाम आहे असे समजले जाते. वास्तविक मारणे किंवा हिंसा करणे हे काम तर कसाई किंवा जल्लाद करतात आणि जर का मारणे किंवा हिंसा करणे यात मर्दानगी असेल तर अशा पुरुषांना सोडून जे दुसरे पुरुष आहेत ते पुरुष नाहीत का? त्यांना विचारले जावे बुद्ध, महावीर, गांधी यांनी तर सूक्ष्म हिंसेलाही त्याज्य् मानलं ते पुरुष होते का नाही? स्वतःच घर सोडून पतीची शरण घेणारी आणि अशा शरणा गतीवर हात उचलणं त्यात कोणत्या प्रकारची बहादुरी आहे? बहुतांशी घरात हे दृश्य आजही पाहावयास मिळतं, अगदी उच्चशिक्षित वर्गातही. स्त्रीला अजूनही हुंड्याच्या नावाखाली जिवंत जाळलं जातं.

एक अशी वेळ होती जेव्हा माणसांना जंगली श्वापदांचे भय असायचे. रात्री तर ते झडप घालायचेच पण दिवसादेखील एखाद्या मनुष्याला उचलून घेऊन जायचे. पण आज ना जंगलं राहिली ना जंगली श्वापदं, तरी समाजात भीती का आहे? दुसरं भय वाटायचं आपल्या देशावर आक्रमण करणाऱ्यांचं,ते यायचे देश लुटायचे, लेकी सुनांवर हात टाकायचे. पण आज मात्र तसे राहिले नाही. आपले वीर जवान सिमेवर त्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्या असण्यामुळे आपण निश्चिंत आहोत. तरी स्त्री मात्र स्वतःला असुरक्षित का समजत आहे? कारण आज दुश्मन जंगलात नाही, सिमे पलीकडे नाही तर गल्ली बोळात खुल्या रस्त्यांवर तथाकथित सभ्य म्ह्णवल्या जाणाऱ्यांमध्ये अस्तनितल्या निखार्‍या सारखा आपले कामांध क्रूर कर्म करतो आहे.
स्त्रीच्या गर्भातून जन्म घेणारा पुरुष आज त्या स्त्रीच्या शरीराकडे भोगदृष्टीने पाहत आहे, स्त्री वर्गासाठी खरोखरच अपमानास्पद गोष्ट आहे. प्रेम या नाजूक भावानेला न समजणारे त्या प्रेमाचा अस्विकार करणाऱ्या मुलीला ॲसिड टाकून जाळू इच्छितात तिला जीवनातून संपवू इच्छितात. प्रेम म्हणजे घेणे नसून देणे असते ही सरळ साधी गोष्ट देखील या नराधमांना माहित नाही. दिल्लीची घटना आठवली तर अंगावर अजूनही शहारे उभे राहतात. क्रूरतेची सर्व सीमा ओलांडली गेली आहे. प्रत्येक दिवसाचे वर्तमानपत्र उघडा, स्री वरील अत्याचाराच्या अनेक घटना वाचावयास मिळतात. आता तर चार-पाच वर्षांच्या छोट्या मुलींना देखील सोडले जात नाही. त्या देखील वासनेच्या शिकार होतात. पोटच्या पोरीवर अत्याचार करणारा बाप पाहिला तर एकच वाटते आता ही दुनिया खरच संपलेली बरी. विकृत मनस्थितीचा केवढा हा कळस! आजच्या उच्चभृ समाजात तर स्रिला एक्सचेंज करणे ही भूषणावह वाटू लागलेय. ज्या पतीबरोबर सप्तपदी चालते त्याच पती परमेश्वरामुळे जीवनातील बिभत्सता ती अनुभवते. कुठेतरी ऑफिसातील बॉसची मनमानी तिला सहन करावी लागते.

२१ व्या शतकाकडे वाटचाल करणारे आम्ही अजूनही वंशवेलीचाच विचार करतोय तर वंश वृद्धी करणाऱ्या स्त्रीचा नाही. त्यामुळे स्त्रीभ्रूणहत्या होताना आजही दिसते. आजचा जमाना इंटरनेटचा .त्यावरही चांगल्या गोष्टी पाहण्याऐवजी अश्लील बघण्यातच आजची तरुण पिढी मग्न झालीय.गर्दीच्या ठिकाणी धक्का मारणारे, बसमध्ये सीटवर बसताना अंगलट करू पाहणारे, बस स्टॉप वर रेल्वे स्टेशनवर उभे असताना लाळ पडण्यासारख्या आषाळभूत नजरेने स्त्रियांकडे बघणारे पुरुष पाहिले की तळपायाची आग मस्तकात जाते. कलि युगाचे अंतिम चरण सुरू झाले आहे.
दुर्योधन हा अजून येथे सत्ता भोगीत आहे .
दु:शासन हा अजून सतीची लज्जा फेडित आहे.

याला कारण काय? आजची फॅशनला महत्व देणारी आधुनिक जीवन पद्धती, सिने क्षेत्र, स्वतंत्रतेच्या नावावर बोकाळलेला स्वैराचार, चमडी दमडी या आणि केवळ याच गोष्टींमध्ये बांधले गेलेले मन, पावित्र्य मांगल्य या संस्कारांचा कुटुंबातील अभाव, सहनशीलतेची कमी, शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी आवश्यक असलेल्या महान चरित्रांचा पडलेला विसर, विचार व जीवन यांची झालेली फारकत, विचार निर्जीव होणे व जीवन विचार शून्य तेकडे जाणे, नैतिक अध्पतन, देहभान व देह अभिमान यांचे अवास्तव वाढत चाललेले स्तोम त्यामुळे आलेली कामांधता .आज काल तर काही स्वयंसेवी संस्था स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवित आहेत. स्त्रियांना मदतीचा हात देण्यासाठी संस्थांची गरज लागावी? त्याच हातावर वर्षानुवर्षे राखी बांधण्याचं पवित्र काम करणारी स्त्री आज काय मिळवतेय?

पण लोकहो टाळी एका हाताने वाजत नाही. जेवढ्या प्रमाणात पुरुष समाज दोषी आहे त्याचप्रमाणे थोड्याबहुत प्रमाणात स्त्री वर्गही दोषी आहे. आज स्त्रियांनी घातलेला पेहराव बघितला तर दुसऱ्या स्त्रियांना डोळे बंद करावेसे वाटू लागतात. सिनेमा याला खरतर सीन की मां अर्थात पापाची जननी म्ह् णणं वावगं ठरणार नाही कारण बऱ्याच अंशी आजची युवा पिढी नट नटींचे अनुकरण करते. गरज नसतानाही मोठ-मोठे होर्डिंग, वृत्तपत्रातील जाहिराती, कादंबरी, मासिकं यातूनही दाखवले जाणारे स्री प्रदर्शन या सर्वांतूनही आपण स्त्रीचा सन्मान करीत आहोत का?

आजचा मानव भोग प्रधान होऊन आपले अमूल्य जीवन पशुतुल्य करत आहे म्हणूनच म्हणावेसे वाटते
विविध भोग चैन आज तुझसि मोहवी
बाह्य डामडौल ढंग तुजसी लोभवी
फसव्या या मृगजळासी दूर सार ना
लाज आज संस्कृतीची तूच राख ना

म्हणून आज भौतिक शिक्षणाबरोबर नैतिक शिक्षण देण्याची ही गरज आहे. गुन्हेगाराला शिक्षा करून त्याचे परिवर्तन होत नाही, बदल हवा असेल तर शिक्षा न देता त्यांच्या स्वभावात, गुणांत बदल घडवून आणणं महत्त्वाचं असतं. सूप्त मन हे एखाद्या बागेसारखं असतं, आपण जर का चांगलं बी पेरलं तर निश्चितच आपली बाग चांगली फुलते .सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुप्त मन हे जागृत मनापेक्षा खूप सामर्थ्यवान असतं, त्यामुळे तिथं चांगलं बीज पेरायचं का तण माजू द्यायचं हे आपणच ठरवायला हवं. मग जशी वृत्ती असेल तशी दृष्टी तयार होईल व कृती देखील तदनुसार होईल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे-
स्रिची अंतरदृष्टी बदलणे गरजेचे आहे. दुर्गणांचा, आसुरी वृत्तीचा संहार करणारं दुर्गेचं रुप, निरंतर पवित्रतेचं दान देणारं गायत्रीचं रुप, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार या विकाररूपी असुरांना समाप्त करणारं, सर्वांना कलंकमुक्त करणारं कालीचं रुप या सर्व रुपांना आठवायचयं आणि तशीच असिम शक्ति स्वत:मध्ये निर्माण करायचीय. स्रि ही शक्तिस्वरुपा.ती जेव्हा शिवाशी जोडली जाते, तेव्हा ती शिवशक्ति होते. कृष्णाने द्रौपदीची वसने पुरवून लाज राखली तशीच आजच्या स्त्रीची लाज राखण्यासाठी शिव परमात्मा देखील आध्यात्मिक ज्ञानाची व राजयोगाची वसने आपल्याला पुरवतायत, गरज आहे ती फक्त शिव परमात्म्याला आणि त्याने दिलेल्या अविनाशी ज्ञानाला ओळखण्याची. याच अविनाशी परमात्म् ज्ञान, दैवी गुण, राजयोगाद्वारा प्राप्त अष्टशक्ती यांनी सर्व मानवमात्रांचे स्वपरिवर्तन आणि त्याचबरोबर विश्व परिवर्तन देखील होते.
रामाची सीता तू गवळण हरीची
झाशीची राणी तू वीज गगनीची
तारक तू रक्षक तू उठ झडकरी
तू दुर्गा तू चंडी उठ पुरंध्री

जेव्हा आध्यात्मिक विचारांचा स्पर्श आपल्या मन बुद्धीला होतो तेव्हा सहजच आपल्यात असणाऱ्या कमतरत, उणीवा, चुका आपल्याला दिसू लागतात, आपण आत्मचिंतन करू लागतो आणि जेव्हा आत्मचिंतनाला सुरुवात होते तेव्हाच परिवर्तनालाही खरी सुरुवात होते. या विषयविकारांच्या दलदलीत आपण मग कमळ बनुन ताठ मानेनं उभं राहू शकतो .देवी देखील कमळात बसलेली दाखवतात .कमळाला पवित्रतेचं प्रतीक मानले जाते. आणि जिथे पवित्रता असते तेथे विकारी वृत्ती टिकू शकत नाही.म्हणूनच असे म्हटले जाते “पवित्रता सुख शांतीची जननी आहे”. स्त्री व पुरुष ही संसाररूपी रथाची दोन चाके आहेत हे आपण जाणतो. तसेच” स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता आहे.” हे देखील आपणास ठाऊक आहे.” जिचे हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उध्दारी” याच नीतीला अनुसरून स्त्रीने विश्वाच्या आधाराची व उद्धाराची जबाबदारी नव्हे हे शिव धनुष्य समर्थपणे उचलायचय व” नर ऐसी करनी करे की नारायण बने और नारी ऐसी करनी करे की लक्ष्मी बने” हे प्रत्यक्षात साकार करण्यासाठी कटिबद्ध व्हायचेय. स्रिच्या महन्मंगल महिमेला निरंतर आठवायचय, “वंदे मातरम्” असे गायन फक्त आणि फक्त स्रिचेच होते,त्या श्रेष्ठ भावनेचा मानसमंदिरात अखंड जागर करायचाय. मग फक्त नऊ दिवस नवरात्रीत देवीची पूजा करण्याची गरज नाही तर अखंडपणे या सर्व देवींची (चैतन्य देवींची)पूजा घडत राहील.

नुतन रविंद्र बागुल
(ब्रह्माकुमारी गामदेवी)